ठाकरे गटाचे खासदार हे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दररोज पत्रकारांशी बोलत असताना ते शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असाच करतात. आजही त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर मी शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या चाळीस लोकांना पक्ष मानतच नाही. तो कोंबड्यांचा खुराडा आहे. कधीही कापला जाईल. भाजपाने कोंबड्यांचा खुराडा तयार केला आहे असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढवणार असल्याची चर्चा आहे असं विचारलं असता संजय राऊत यांनी टीका केली आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
मूळात तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते बोलतात, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही. त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. यावेळी ती संख्या कायम राहिल. कोण शिंदे मिंधे आहेत त्यांचे पाच खासदार आले तरी मोठी गोष्ट मानेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
द्रौपदी मुर्मूंना सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे?
दुसरीकडे नव्या संसदेच्या उद्घानटावरुनही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे हे मोदींनी समोर येऊन सांगावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियात लोकशाही आहे, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पाय धरले याचे कसले गोडवे गात आहात? असाही सवालही संजय राऊत यांनी केला आहे. आम्हीच निर्णय घेणार, आम्हीच ठरवणार, राष्ट्रपती कोण? सरन्यायाधीश कोण? आम्हीच सार्वभौम या मानसिकतेतून हे घडतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपाकडून आमच्यावर टीका केली जाते आहे पण..
एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपा आमच्यावर टीका करते आहे. मात्र आम्ही फक्त विरोधासाठी विरोध करत नाही. हा संविधानाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका आहे त्यावर राष्ट्रपतींचं नाव नाही, तसंच उपराष्ट्रपतींचंही नाव नाही. याविषयी कुणी काहीही बोलत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.