मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सध्या राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, स्थानिक भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध करत “माफी मागेपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही”, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली असताना त्यासंदर्भात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्यांनी राज ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील निशाणा साधला आहे.

“बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही”

उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा देणाऱ्या बृजभूषण सिंह यांचं संजय राऊतांनी यावेळी कौतुक केलं आहे. “उत्तर प्रदेशच्या जनतेच्या काही भावना असतील आणि त्यांचा उद्रेक एखादा नेता करत असेल, तर त्यांच्याशी आम्हाला संवाद साधावा लागेल. बृजभूषण लढवय्ये आहेत. त्यांचे-आमचे संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणतो. तो माणूस मागे हटणारा नाही”, असं राऊत म्हणाले.

“राज ठाकरेंनी पूर्वीची भूमिका का सोडली?”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून टीका केली आहे. “राज ठाकरेंची पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली? ते मला माहिती नाही. उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांच्या विरुद्ध त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी काही भूमिका घेतली होती. पण एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले. त्यामुळे तिकडच्या काही लोकांनी यावर लोकशाही मार्गाने प्रश्न विचारले असतील”, असं ते म्हणाले.

Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

“राज ठाकरेंनी अयोध्येत ठाण मांडून बसावं”

“राज ठाकरेंना अयोध्येला जाऊ द्या. ते तिथेच ठाण मांडून बसले, तिथे एखादं घर घेतलं, आश्रम बांधला हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचं नातं आजचं नाहीये. राजकीय नाही. आम्ही तिथे सतत जात-येत असतो. आंदोलनापासून आमचा तिथे संबंध आहे”, असं संजय राऊत म्हणाले.