Sanjay Raut on Eknath Shinde: “राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत. सरकारी खर्चातून दावोसला गेलेले उदय सामंत तिथे बसून एकनाथ शिंदेंचेच आमदार फोडत आहेत. पण त्यांचे पितळ उघडे पडल्यामुळे ते सारवासारव करत आहेत”, असा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला. ज्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांना आशीर्वाद दिला होता. त्यांचाच उदय सामंत यांना आशीर्वाद आहे. एकनाथ शिंदे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना नकोसे होतील, आता ते फडणवीसांना नकोसे झालेले आहेतच, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

दावोसमध्ये बसून उद्योग मंत्री शिवसेनेचे किती आमदार फुटणार, याची माहिती देत आहेत. महाराष्ट्रात कोणत्या कंपनीची किती गुंतवणूक आली, हे सांगण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे किती आमदार, खासदार भेटले, काँग्रेसचे कोण भेटले, हे सांगण्याची गुंतवणूक करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला पाठवायला पाहीजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्याकडून दावोस दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहीजे. दावोस ही राजकारण करण्याची जागा नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवसेना फोडण्याची भाषा केली जात आहे. आता संजय राऊत, आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांना भेटले, एवढंच बोलायचे बाकी ठेवले आहे. आम्ही मरण पत्करु पण बाळासाहेबांची शिवसेना सोडणार नाही. ज्यांना जायचे होते, ते बेईमान लोक गेले आहेत. आम्हाला बाळासाहेबांच्या विचारांचा स्वाभिमान आहे.

बच्चू कडूंच्या दाव्यावर पलटवार

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. या विधानावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, बच्चू कडूंनी स्वतःच्या राजकारणाविषयी बोलावे. स्वतःच्या पातळीवर बोलले पाहीजे.

Story img Loader