शरद पवारांनी मनात आणलं असतं तर अजित पवारही मुख्यमंत्री झाले असते अशा चर्चा होतात. पण मुख्यमंत्री होणं नशिबाचाही भाग आहे. अनेकदा असे लोकही मुख्यमंत्री झाले आहेत ज्यांची क्षमता आणि लायकी नाही. विशेषतः भाजपाच्या काळात अनेक राज्यांमध्ये आपण पाहिलं असेल की सक्षम लोकांना बाजूला सारुन होयबांना मुख्यमंत्री करण्यात आलं. अजित पवारांसारखे लोक कधी होयबा झाले हे मी पाहिलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत जे दोन व्यापारी बसले आहेत, त्यांना..

दोन्ही बाजूच्या लोकांनी खात्रीने सांगितलं आहे की अजित पवारांनी दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र याव्यात यासाठी पुढाकार घेतला होता. आमची जी माहिती आहे त्यानुसार दोन पक्षांच्या बैठकाही झाल्या ही आमची माहिती आहे. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला असला तरीही अनेकदा असं जाणवलं की शरद पवारांविषयी यांच्याविषयीची आस्था, आदर आणि ओलावा हा शेवटपर्यंत होता. एका विशिष्ट कारणामुळे त्यांना पक्ष बदलावा लागला. धाक, दहशत, धमक्या अशा माध्यमांतूनच त्यांनी पक्ष सोडला. जे झालं ते बरं नाही हे अजित पवारांना वाटत होतं. शरद पवारांनी उभा केलेला पक्ष आहे हे त्यांना माहीत होतं. दिल्लीत जे व्यापारी नेते बसले आहेत त्यांना मराठी माणसं एकत्र यावीत, नेते एकत्र यावेत असं वाटतच नाही. तोडा, फोडा आणि राज्य करा ही त्यांची निती आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील, कांबळे, जाधव कुणीही असावा ही लोकभावना-राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला पक्ष आहे. या पक्षाचा अध्यक्ष पाटील, जाधव, कांबळे असाच असावा ही लोकभावना आहे. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण त्यांनी देशभ्रमण केलं नाही पक्ष वाढवायला ते महाराष्ट्रातच होते. देशभ्रमण शरद पवारांनी केलं. अजित पवार आणि शरद पवार यांची पुणे, पिंपरी चिंचवड यांच्यात युती झाली होती. त्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही एकाच वेळी आघाडी, युतीत कसे असू शकता? पण एका गोष्टीचा त्याग करावाच लागतो.

शरद पवार भाजपासह जातील असं वाटत नाही-राऊत

शरद पवार भाजपासह जातील असं मला वाटत नाही. कारण शरद पवार त्यांच्या विचारांशी प्रतारणा करतील असं वाटत नाही. १२ फेब्रुवारीला एकत्र यायचं असं दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं होतं ही माहिती अजित पवारांच्या निधनानंतर बाहेर आली आहे. अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार की शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाणार याबाबत स्पष्टता नव्हती असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदेंचा जो काही गट आहे आणि अजित पवार यांचा जो काही पक्ष आहे त्याचं नेतृत्व अमित शाह यांच्याकडेच असणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.