Sanjay Raut statement six rebel MPs: उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेल्या सहा खासदारांची सदस्यता रद्द होईल, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले. “मूळ पक्षाचा विलीन होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत सहा लोकांना अशा प्रकारे पक्षात विलीन होता येत नाही, संविधानात तशी तरतूद नाही”, असे राऊत नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. एकनाथ शिंदे दिल्लीत शाहांच्या भेटीला दाखल झाले असताना राऊतांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, रामरक्षा पाठ असणाऱ्यांनीच दानपेटी चोरली आहे अशा शब्दात टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी भाजपावर केली.
१८ जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १८ जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन केले जाणार आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. राम हा राजकीय विषय नाही. सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. नागपूर देशाची उपराजधानी आहे त्यामुळे आम्ही इथे आंदोलन करणार आहोत, असे राऊतांनी स्पष्ट केलं. तसेच, आम्ही सगळ्यांना यासाठी आमंत्रित करु. संघाच्या लोकांनाही आम्ही बोलवू. देवेंद्र फडणवीस १८ जुलैला जर नागपूरमध्ये असतील तर त्यांनीही यावं, असेही राऊत म्हणाले.
सहा जणांची खासदारकी रद्द होईल – राऊत
फुटीर सहा खासदारांबाबत बोलताना संजय राऊतांनी सहा जणांची खासदारकी रद्द होईल असे वक्तव्य केले. “आमची कायदेशीर लढाई सुरु आहे. या सहा जणांना सहजपणे सगळं होईल एवढं सोपं नाही. त्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. तुम्ही बघा हे ना घर के रहेंगे ना घाट के. मूळ पक्षाचा विलीन होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत या सहा लोकांना विलीन होण्याचा अधिकार नाही. मनात येईल तेव्हा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून असं करता येत नाही. संविधानांच्या दहाव्या शेड्युलमध्ये अशी तरतूद नाही”, असे राऊतांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे शाहांच्या भेटीला दिल्लीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. शिंदे यांच्याबरोबर सहा फुटीर खासदार देखील असल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या सुरु असणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे.
