पृथ्वीराज चव्हाण यांनी असा दावा केला होता की गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते, त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी होती. त्यानुसार, सगळं ठरलं होतं पण ऐनवेळी त्यांचा पक्षप्रवेश नाकारण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलं होतं. ज्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनीही एक वक्तव्य केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

“गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते, त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी होती. त्यानुसार, सगळं ठरलं होतं पण ऐनवेळी त्यांचा पक्षप्रवेश नाकारण्यात आला.” याबाबत पंकजा मुंडेंनीही प्रतिक्रिया दिली.

पंकजा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं, आता काय करायचं, आता त्याचं सिग्निफिकंट काही नाही. मुंडेसाहेब हयात नाहीत, त्यामुळे आता त्यांच्याविषयी बोलणे उचित नाही आणि त्याचं औचित्यही नाही. मला जे माझे वडील कळले ते या कमळात जन्मले आणि कमळातच विसावले हा त्यांचा पूर्ण प्रवास आहे. आजच्या परिस्थितीत अजूनही लोक त्यांचं नावं घेतात, पृथ्वीराज बाबांनी आदरानेच नाव घेतलं असेल. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तर संजय राऊत म्हणाले की गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.

खासदार संजय राऊत गोपीनाथ मुंडेंबाबत काय म्हणाले?

सोनिया गांधी या गोपीनाथ मुंडेंना पक्षात घ्यायला तयार होत्या हे पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सांगितलं ते योग्यच आहे. पण तेव्हा मनमोहन सिंग यांनी विरोध दर्शवला होता कारण ते पक्षांतराच्या विरोधात होते. शरद पवार यांनीही त्यावेळी हेच सांगितलं होतं असं संजय राऊत म्हणाले. तसंच पुढे ते म्हणाले की गोपीनाथ मुंडे यांचा भाजपात छळ झाला होता. या लोकांनी त्यांचा छळ केला होता. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर आघात केले जात होते. त्यांचा अपमान केला जात होता. आम्हाला माहीत आहे, आम्ही तेव्हा दिल्लीत होतो. गोपीनाथ मुंडे शरद पवारांना भेटले, काँग्रेसच्या नेत्यांना भेटले होते. मनमोहन सिंग हे एक सज्जन गृहस्थ होते. त्यांनी अशा प्रकारच्या पक्षांतराला विरोध केला होता. कदाचित गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. असं विधान संजय राऊत यांनी केलं. आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांनी जो दावा केला त्याबाबत विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे.