ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील फोटो पोस्ट केला आणि एकच खळबळ उडवून दिली. कारण त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट केल्या जाऊ लागल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत असंही म्हटलं. त्या सगळ्याविषयी आणि आदित्य ठाकरेंच्या व्हायरल फोटोविषयी विचारलं असता संजय राऊत यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा ब्रांड एकच आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. मोदी आणि आदित्य ठाकरेंचा ब्रांड एकच आदित्य ठाकरेंचा जो फोटो पोस्ट केला आहे त्यात नीट बघा. तो ग्लास आहे की डाएट कोकचा कॅन आहे? एकदा नीट बघा म्हणजे समजेल. मी कालही त्यावर उत्तर दिलंय. मोदींचे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच आदित्य ठाकरेंचा ब्रांड आहे. आदित्य ठाकरे डाएट कोक पित आहेत, हे दिसत असताना हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेलं नाही. ईडी आणि सीबीआय यांच्या हातात नसतील तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणीही तोंडपाटिलकी करु नये हिंमत असेल तर समोर या असंही आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच भाजपा म्हणजे भारतीय जुगारी पार्टी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपा म्हणजे भारतीय जुगारी पार्टी भाजपा ही भारतीय जुगार पार्टी आहे. हे (भाजपा) वेडे लोक आहेत. भाजपासारख्या लोकांच्या विरोधात आम्ही लढतोय म्हणून त्यांना आम्ही विकृत वाटत असू काही हरकत नाही. आम्ही जर गोष्टी काढायला गेलो तर देश सोडून निघून जातील. भारतीय जुगार पार्टी अर्थात गँबलिंग करणं हेच यांचं ध्येय आहे. नैतिकतचे धडे दुसऱ्यांना शिकवत असतात. मात्र यांच्यासारखी भ्रष्ट पार्टी दुसरी नाही असंही राऊत म्हणाले. कॅसिनोत कुणी सँडविच, इडली खायला जात नाही कॅसिनोमध्ये काय कुणी सँडविच किंवा इडली खायला जात नाही. मकाऊ, बँकॉक हे काही थंड हवेचं ठिकाण नाही. अशा ठिकाणी जाऊन बसणं हा काही गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे? पण जाऊन तुम्ही खोटं बोलत आहात. मकाऊला मी पण जाऊन आलो आहे. एक गाव कसं उभं राहतं आहे ते मी पाहिलं आहे. आपण जबाबदार लोक आहोत. इथे येऊन आम्हाला ज्ञान दिलं जातं आहे. भाजपाला हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असं सांगतो त्या रात्री फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतलं. पोकर्स ही तिथली करन्सी आहे. त्यांच्यापुढे पोकर्स आहेत. मला ते माहीत नव्हतं. माझ्याकडे २७ फोटो आणि व्हिडीओ आहे. आणखी एक महाशय होते त्यांनीही दोन कोटींचे पोकर्स विकत घेतले आहेत. आता भाजपाच्या लोकांना अच्छे दिन आले असतील.