Sanjay Raut Supports Mamata Banerjee: “राजीनामा देणार नाही ही ममता बॅनर्जी यांची भूमिका म्हणजे त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे”, असे शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार खटल्याचा दाखला देत, “बॅनर्जी यांचा राजीनामा न देण्याचा निर्णय पूर्णपणे न्याय्य आहे”, असे म्हणत भूमिकेचे समर्थन केले. हा पराभव मान्य नसल्याचे ममतांनी म्हटले आहे. या त्यांच्या मतांशी आम्ही सहमत असल्याचे स्पष्ट करत, ममता बॅनर्जी यांच्या लढाईला इंडिया आघाडीचा पाठिंबा असून, आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे राऊतांनी सांगितले.
इंडिया आघाडीचा ममतांना पाठिंबा
“ममता बॅनर्जी कालपर्यंत इंडिया आघाडीबरोबर नव्हत्या पण, इंडिया आघाडी आता त्यांच्याबरोबर आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा करुन या लढाईत सोबत असल्याचे सांगितले. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ममता बॅनर्जी पराभव झाला नसल्याचे मांडत असलेल्या मताशी आम्ही सहमत आहोत. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, मतदार याद्यामधून नावं वगळून मोदी आणि शहांनी ममतांचा पराभव केला. बंगालमध्ये त्यांनी इराण-इस्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ममतांच्या त्या गोष्टी खऱ्या – राऊत
“निवडणूक आयोग खलनायक आहे आणि या ‘खलनायका’ने ही निवडणूक जिंकली आहे. मतदान केंद्रांवर आणि मतमोजणी केंद्रांवर धमक्या देण्यात आल्या, जे एक अत्यंत लज्जास्पद कृत्य होते. १०० विधानसभा जागांवर गैरप्रकार झाला आणि लाखो नावे वगळण्यात आली, असे मत त्यांनी मांडले असून या गोष्टी खऱ्या आहेत”, असे राऊत म्हणाले. “मुख्यमंत्री असतानासुद्धा, ईडी आणि केंद्र सरकारसारख्या यंत्रणांविरुद्ध निषेध करण्यासाठी त्या सातत्याने रस्त्यावर उतरल्या आहेत”, असेही राऊत पुढे म्हणाले.
राऊतांचा युक्तिवाद
“ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय पूर्णपणे न्याय्य आहे. CJI चंद्रचूड यांच्या उद्धव ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार खटल्यातील निकालानुसार, कोर्टाने उद्धव ठाकरेंना पदावर पुनर्स्थापित केले नाही, कारण त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता”, असे मत राऊतांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून मांडले आहे.
विरोधकांनी एकत्र येण्याची गरज – राऊत
ममता बॅनर्जी त्यांचा पराभव झाला नसल्याचा दावा करत असून, राजीनामा देणार नाही हा त्यांचा आंदोलनाचाच एक भाग असल्याचे राऊत म्हणाले. “सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाहीविरोधी ज्या कृत्यांची मालिका तिथे झाली. हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग आहे”, असे राऊत म्हणाले. “या हुकूमशाही, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल, तसेच यापुढे निवडणूक लढायची की नाही? हे ठरवावं लागेल”. सत्तेत असलेल्या अनेकांना देखील लोकशाहीचे हे पतन मान्य नाही, त्यांना देखील आवाहन करण्याची गरज राऊतांनी व्यक्त केली.
नितीश कुमार, तमिळनाडू निकालावर भाष्य
नितीश कुमार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. “कुमार इंडिया आघाडीत राहणार नाहीत”, याबाबत स्पष्ट भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली होती, असे राऊत म्हणाले. “तमिळनाडूत एक वेगळीच लाट आली आणि नागरिकांनी तिसरा पर्याय निवडला हे मान्य करायला हवं. पण, द्रमुक आणि काँग्रेस जुने मित्र आहेत. युतीचा त्यांचा अंतर्गत विषय असून तेच त्यावर भाष्य करतील”, असे म्हणत राऊतांनी युतीवर थेट भाष्य करण्याचे टाळले.
