scorecardresearch

“काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात”, भोंग्यांच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा!

संजय राऊत म्हणतात “आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव या देशात फक्त शिवसेनेला आहे. आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे.”

sanjay raut slams raj thackeray
संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका!

राज्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. आजपासून मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी मात्र कुठ आहे आंदोलन? असा प्रश्न उपस्थित करत मनसेवर आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच, नमाज, भोंग्यांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचे सल्ले दुसऱ्यांनी द्यायची गरज नाही, असं देखील राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंची भूमिका आणि मनसेचं आंदोलन यावरून टीका केली आहे. “आंदोलन आहे कुठे? मुंबईचे पोलीस आयुक्त राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांचं निवेदन पाहिलं तर स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रात भोंग्याच्या बाबतीत कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही. हे आंदोलन कोण करतंय मला माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयानं भोंग्यांच्या बाबतीत जे नियम घालून दिले आहेत त्यावर राज्य सरकार काम करतंय. त्यापलीकडे कुणी बेकायदा काम करत असेल, तर सरकार सक्षम आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव शिवसेनेला”

“मला कुठेही आंदोलन दिसत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदेशीर भोंगेच नसतील आणि उलट तुम्ही बेकायदेशीर भोंगे लावत असाल, तर तुम्ही आंदोलन करताय की दुसरं काही कृत्य करताय हे ठरवा. आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव या देशात फक्त शिवसेनेला आहे. आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे. आंदोलनं फक्त प्रसिद्धीसाठी आणि चिथावणीसाठी नसतात. गेली ५०-५५ वर्ष शिवसेना फक्त आंदोलनंच करते आहे. सत्तेत जरी आम्ही असलो, तरी आंदोलनाशी आमचा संबंध कायम आहे. पण जिथे आंदोलनच होऊ शकत नाही, तिथे आंदोलन केलं म्हणायचं”, असं राऊत म्हणाले.

“एक सच्चा मुस्लीम कधीच…”, भोंग्यांच्या वादावर निलेश राणेंचं ट्वीट; अमरावती-नांदेड दंगलींचा केला उल्लेख!

“..त्यांना कुठूनतरी बळ मिळत असतं”

“ठीक आहे. काही लोकांचे छंद असतात. काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात. त्यांना कुठूनतरी राजकीय प्रेरणा, बळ मिळत असतं. त्यातून असे प्रसंग निर्माण होतात. पण महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार आहे. जरी आघाडीचं सरकार असलं, तरी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील नमाजाच्या संदर्भात काय करायचं आणि मशिदीवरील बेकायदा भोंग्यांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याचे सल्ले दुसऱ्यांनी द्यायची गरज नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मनसेवर आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“कुणीतरी अल्टिमेटम देतोय म्हणून…”

“आजही हा विषय आल्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक मंदिरांचे ट्रस्टनी आम्हाला कळवलं की आमच्या गावात मनोरंजनाचं दुसरं साधन नाही. नाटक-सिनेमा ही आमची संस्कृती नाही. आम्ही भजन-कीर्तनात दंग असतो. तुम्ही आमचे कार्यक्रम बंद करणार का? सरकार नियमानुसार वागत असेल, तर त्यांना नियमानुसार वागू द्या. कुणीतरी अल्टिमेटम देतोय म्हणून हे राज्य चालणार नाही”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut targets mns chief raj thackeray on loudspeaker issue pmw

ताज्या बातम्या