scorecardresearch

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करताच राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “इतिहास माहिती नसेल तर पुन्हा…!”

संजय राऊत म्हणतात, “शिवसेना प्रमुखांच्या भूमिकांचा, विचारांचा इतिहास हा आमच्यासारख्यांना कुणी सांगण्याइतकं आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. आजही…!”

sanjay raut on raj thackeray balasaheb thackeray old video
संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा!

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे आणि राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. ३ मेचा अल्टिमेटम संपल्यानंतर आजपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. त्यापाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या भूमिकेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आज सकाळी बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर केल्याबाबत राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

राज ठाकरेंनी आज सकाळी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना दिसत आहेत. “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील”, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत.

“जुने काय, प्राचीन व्हिडीओ जरी टाकले…”

दरम्यान यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बाळासाहेबांचे जुने काय प्राचीन व्हिडीओ जरी टाकले, तरी आम्हाला बाळासाहेबांविषयी कुणी सांगण्याची गरज नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासले पाहिजेत. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकांचा, विचारांचा इतिहास हा आमच्यासारख्यांना कुणी सांगण्याइतकं आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनीच चालतो. आम्हाला काय सांगताय?” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात”, भोंग्यांच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा!

“बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट आम्ही त्यांच्याकडे पाठवू”

“बाळासाहेबांनी भोंग्याच्या बाबतीत, रस्त्यावरच्या नमाजाच्या बाबतीत जरूर भूमिका मांडली. पण त्यांनी रस्त्यावरचे नमाज तोडगा देऊन बंद केले. हा इतिहास कुणाला माहिती नसेल, तर त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब समजून घ्यावे, बाळासाहेब वाचावेत. यासंदर्भातल्या बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट आम्ही त्यांच्याकडे पाठवून देऊ”, असा टोला राऊतांनी राज ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut targets raj thackeray on balasaheb thackeray loudspeaker video pmw

ताज्या बातम्या