संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेनं अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर आता ही राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, अशा शब्दांत खंत देखील संभाजीराजेंनी बोलून दाखवल्यानंतर त्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नव्याने दावा केला आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना यासंदर्भात संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

“कोल्हापूर हॉट झालंय”

पत्रकार परिषदेला सुरुवात करतानाच संजय राऊतांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालंय असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीच्या मुद्द्याला अप्रत्यक्षपणे हात घातला. यावेळी भाजपावर देखील त्यांनी निशाणा साधला. “राज्यात विरोधी पक्ष हा विरोधासाठी विरोध करत आहे. महाविकास आघाडीनं काही निर्णय घेतला तर त्याला टीका करायलाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यातून त्यांना कोणता आसूरी आनंद मिळतो ते माहीत नाही. मनं शुद्ध नसली, की लोकं असा आसुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात”, असं ते म्हणाले.

“मला फार वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांनी…”, संभाजीराजे छत्रपतींच्या तीव्र भावना; म्हणाले, “माझी ताकद ४२ आमदार नाही!”

“आमच्यासाठी हा विषय संपलाय”

दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी संभाजीराजेंची उमेदवारी हा विषय आमच्यासाठी संपल्याचं स्पष्ट केलं. “मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेचा उमेदवार तिथे आणायचा हे आधीच ठरलं होतं. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होतं की पुरस्कृत हा विषय मला सहकाऱ्यांशी बोलावा लागेल. हा सगळा विषय संपलेला आहे. आमच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी हा निर्णय घेतला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“इतरांनी चोमडेपणा करू नये”

दरम्यान, या मुद्द्यावरून टीका करणारे भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊतांनी टोला लगावला आहे. “चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी २०१९ला आम्हाला दिलेला शब्द मोडल्याबद्दल आधी खुलासा करावा. तेव्हा कुणी शब्द दिला होता आणि कुणी मोडला? हा संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी चोमडेपणा करू नये. देवेंद्र फडणवीसांनी ४२ मतं द्यावीत. आमच्या पक्षाच्या निर्णयाबाबत आम्ही त्यांना उत्तर का द्यायचं?” असा सवाल त्यांनी केला.

“राजकारणात पुढे जायचं असेल, तर राजे, राजघराणी यांना कोणत्यातरी पक्षाचा हात धरावाच लागतो. राणा प्रतापांचे वंशज देखील राजस्थानात कुठल्यातरी पक्षात आहेत. प्रत्येकाचे राजकीय लागेबांधे आहेत. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी स्वीकारली नाही. आमच्यासाठी विषय संपला”, असं संजय राऊत म्हणाले.