ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत ते त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे. संजय राऊतांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एका अल्पवयीन लैंगिक अत्याचार पीडितेचा फोटो शेअर केल्यामुळा वाद निर्माण झाला आहे. पीडितेची ओळख जाहीर केल्यामुळे संजय राऊत वादात सापडले असताना त्यांच्याविरोधात बार्शीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याामुळे आता संजय राऊतांवर काय करावाई होणार? याविषयी चर्चा सुरू झालेली असताना संजय राऊतांनी मंगळवारी सकाळी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. संजय राऊतांनी सोमवारी रात्री केलेल्या ट्वीटमध्ये कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतलं असून गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधींचे शेअर्स गोळा केल्याचा दावा संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये केला आहे. तसेच, एवढं करूनही संकेतस्थळावर मात्र कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील आमदार-मंत्र्यांविरोधात संजय राऊतांनी आपला विरोध तीव्र केल्याचं दिसून येत आहे. “महाराष्ट्र सरकारला कधीपासून चुंबनाचं वावडं झालं?”, संजय राऊतांचा खोचक सवाल; म्हणाले, “यांचा लव्ह जिहाद…!” काय म्हटलंय ट्वीटमध्ये? संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये गिरणा अॅग्रोच्या नावाने लूट चालल्याचं म्हटलं आहे. दादा भुसेंचा फोटो शेअर करत राऊत ट्वीटमध्ये म्हणतात, "हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल". बार्शीत नेमकं काय घडलं? दरम्यान, या ट्वीटनंतर संजय राऊतांनी बार्शीतील प्रकारासंदर्भातही एक ट्वीट केलं आहे. त्यात सुषमा अंधारेंच्या सभेतील एका व्हिडीओचा संदर्भ त्यांनी दिला आहे. "बार्शी नक्की काय घडलं. सुषमाताई अंधारे यांनी नेमक्या शब्दांत चिरफाड केली. एका मुलीवर अत्याचार झाला. आवाज उठवला म्हणून थेट माझ्यावर गुन्हा दाखल झाला. सरकार बेकायदेशीर. कारवाई बेकायदेशीर. पीडितेच्या आईने इच्छा मरणाची मागणी केली..का? काय चालू आहे महाराष्ट्रात?" असा प्रश्न राऊतांनी या ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.