Sanjay Raut Statement On Jaykumar Gore: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर आता संजय राऊतांनी गोरेंविरोधात टीका केली आहे. जयकुमार गोरे यांनी देखील कोण संजय राऊत म्हणत? प्रतिक्रिया देण्यास टाळले होते. यावर आता राऊतांनी जयकुमार गोरेंना दूर राहण्याचा सल्ला देत जवळ फिरकल्यास अडचणीत याल, असा इशारा दिला आहे.

गुन्ह्याबाबत माहिती नाही – राऊत

सोलापूरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत राऊतांना विचारण्यात आले. “राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असतात, कशासाठी गुन्हा दाखल झालाय? मला कल्पना नाही. सरकारमधील लोकं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे शब्दांनी अपशब्दाचे अवरण चढवून गुन्हे दाखल केले जातात. किंती गुन्हे दाखल करणार? आंदोलकांवर गुन्हे दाखल केले म्हणून ते घाबरले?,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊतांनी रविवारी जयकुमार गोरे यांच्या अटकेच्या बातमीचा एक फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत टीका केली होती. याबाबतही राऊतांना विचारण्यात आले.

सत्तेत असल्यामुळे दाखल केले जात असल्याचा आरोप

“जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य सभ्येत्याच्या कोणत्या चौकटीत बसते? उद्वव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, शिवसेनाप्रमुख आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करायचं आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर तुम्ही गुन्हे दाखल करायचं याला हुकूमशाही म्हणतात. आज सत्ता आहे म्हणून गुन्हे दाखल केले जात आहेत. उद्या सत्ता नसेल त्यावेळेस काय कराल? याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे”, असे संजय राऊत गोरेंवर टीका करताना म्हणाले.

जयकुमार गोरेंना इशारा

मंत्री जयकुमार यांनी कोण संजय राऊत? असे म्हणत त्यांना ओळखत नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना राऊतांनी, “चांगलं आहे. त्यांनी माझ्या आसपासही फिरु नये, त्रास होईल त्यांना. त्यांनी मला ओखळू पण नये, त्यांनी ओळखण्याचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील”, असे संजय राऊत म्हणाले.

राऊतांविरोधात गुन्हा दाखल

पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजपाचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिली संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद दिली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वक्तव्य करताना संजय राऊत यांनी शिवीगाळ केली होती. त्याविरोधात नगरसेवक मनीष केत यांनी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत यांच्या विरोधात BNS कलम 356(2), 352 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.