महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन शिवसेनेनेची भूमिका मांडणार आहोत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशात शिवसेनेने राज्यपालांची भेट घेण्याचे ठरवून दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

राज्यपालांशी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा करणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. त्याच अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या अनुभवाचा आम्हाला काही फायदा होतो का ते पाहणार आहोत असंही राऊत यांनी पत्रकरा परिषदेत स्पष्ट केलं.

24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानंतर भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. महायुतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात जुंपली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगितला आहे. तर भाजपा तसं करण्यास तयार नाही, त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये जुंपली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं संजय राऊत यांनी अनेकदा सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजच पत्रकार परिषद घेऊन जे ठरलं आहे तसंच झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना दबावतंत्राचा वापर करताना दिसते आहे. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले आहेत. आता पुढे काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले असताना संजय राऊत यांनी मात्र राज्यपालांची भेट घेण्याचं ठरवलं आहे. संध्याकाळी पाच वाजता ही भेट घेतली जाणार आहे.