भाजपा नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच विधानावरून निशाणा साधला आहे. “शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणातात, हे असं म्हणण्यासारखं आहे की मांजर कधीच उंदीर खात नाही. ” असं अनिल बोंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

“…त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल”; संजय राऊत यांचा भाजपाला इशारा

याचबरोबर, “शरद पवारांना मी कालच विनंती केली होती, सांगितलं होतं की इथे शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, मदत मिळाली नाही, बोनस जाहीर झाला नाही. शिवाय एसटी कामगारांचा देखील संप आहे, मोठ्याप्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळे शरद पवार यांनी येऊ नये. अस्वस्थता असंतोष त्यांना कदाचित त्यांच्या दौऱ्यात नागपूर, चंद्रपूरमध्ये दिसला असेल आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल. त्यामुळे त्यांनी यवतमाळ आणि वर्धेचा दौरा रद्द केला. माझी डॉक्टर या नात्याने त्यांना विनंती आहे, की त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कारण, विदर्भातील हवामान राष्ट्रवादीला मानण्यासारखं नाही.” असंही यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितलं.

तर, संजय राऊत म्हणाले होते की, “शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय.”