scorecardresearch

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका २० फूट खाली गाडले जाल – संजय राऊतांचा राणा दाम्पत्यास इशारा!

“आमचं हिंदुत्व घंटाधारी नसून गदाधारी आहे; या अमरावतीच्या बंटी आणि बबलीचा श्रीरामाचं नाव घ्यायलाही विरोध होता. ”असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

राज्यभरात मागील दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर वातावरण चांगलचं तापलेलं होतं. शिवाय, राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईत देखील आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगत, आपले आंदोलन रद्द केले. माध्यमांसमोर त्यांनी तशी घोषणा देखील दिली. यानंतर आता शिवसेनेकडून त्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकारपरिषद घेत राणा दाम्पत्य आणि भाजपावर जोरदार टीका केली.

“आम्ही आंदोलन संपवत आहोत”, राणा दांपत्याची मोठी घोषणा; मातोश्रीवर जाणार नाही, दिलं ‘हे’ कारण!

संजय राऊत म्हणाले, “मागील दोन दिवसांपासून काही बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी मुंबईसह महाराष्ट्रात संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणं, मातोश्रीवर घुसून हनुमान चालीसा वाचणं, अशा प्रकारची भाषा त्यांनी नुसती वापरली नाही तर जणू काही आम्ही महान योद्धे आहोत, सत्यवादी आहोत अशाप्रकारचा आव आणून ते अमरावतीचे बंटी आणि बबली मुंबईत आले. त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, हो मला आता समजलं नागपुरात की पंतप्रधानांची मुंबईत दौरा आहे. त्या दौऱ्याला गालबोट लागू नये, या सबबीखाली त्यांनी पळ काढला.पंतप्रधानांच्या दौऱ्याची जबाबदारी राज्य सरकारची महाराष्ट्राची तर आहेच, ते पंतप्रधान आमचे देखील आहेत. एक पक्षाचे नाहीत आणि पंतप्रधानांबाबत आम्हालाही तितकाच आदर आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, किंबहूना कोणी गालबोट लावत असेल तर तिथे सरकार काय? सरकार असो किंवा नसो, शिवसेना तिथे ठामपणे उभी राहील, पंतप्रधानांचं रक्षण करण्यासाठी किंवा जे गालबोट लावू इच्छितात त्यांचा समाचार घेण्यासाठी. त्यामुळे आता हे जे बंटी आणि बबली गालबोट लागेल म्हणून आम्ही माघार घेत आहोत हा त्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.”

हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपाचे काही प्रमुख लोक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून –

तसेच, “मुंबईत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत, जो रेटा आहे शिवसैनिकांचा. मला आमच्या शिवसैनिकांचं आश्चर्य आणि कौतुकही वाटत आहे. माझं आताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, शिवसैनिकांनी तिथे काही रुग्णवाहिका देखील तयार ठेवल्या होत्या, जर बंटी आणि बबलीला रुग्णवाहिकेतून न्यावं लागलं तर. म्हणजे आंदोलन करणाऱ्यांची शिवसैनिक किती काळजी घेतात बघा, आमच्या शिवसैनिकांचा मानवतावादी दृष्टीकोन पाहा. पूर्णपणे हे भंपक, बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपाचे काही प्रमुख लोक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल आणि आज यांना मातोश्रीवर घुसून काही वेगळं करण्याचं कारस्थान यांनी रचलं होतं. हनुमान चालिसा वाचायची असेल, तर आपल्या घरातही वाचता येते. मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचता येते. अशा अनेक अध्यात्मिक आणि धार्मिक जागा आहेत, जिथे जाऊन तुम्हाला हनुमान चालीसा वाचता येईल, इतर काह धार्मिक गोष्टींचं पठण करता येईल. त्यासाठी मातोश्रीची निवड करून महाराष्ट्रात गोंधळ आणि अस्थिरता निर्माण करणं, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणं हे कोणाचं कारस्थान आहे? या ज्या खासदार आहेत, त्यांचा हिंदुत्वाशी काय संबंध? या बंटी आणि बबलीचा श्रीरामाचं नाव घ्यायला यांचा विरोध होता. अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता. हिंदुत्व शब्द घ्यायला यांना लाज वाटत होती आणि आज ही लोक हनुमान चालीसा, हिंदुत्व अशाप्रकारची भाषा वापरून महाराष्ट्रासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व हे अशा घंटाधारीच, घंटा वाजवणाऱ्यांचं नाही. आमचं हिंदुत्व घंटाधारी नसून गदाधारी आहे. आम्ही कायम हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हातामध्ये गदा घेतलेली आहे, तलावर घेतलेली आहे आणि गरज पडली तेव्हा अयोध्येत हातोडे देखील घेतलेले आहेत. तेव्हा हिंदुत्व आम्हाला शिकवण्याचा कोणी अतिशहाणपणा करू नये. हे जे दीड शहाणे आहेत, त्यांना आम्ही आजही सांगतो कृपा करून शिवसेनेच्या वाटयाला जाऊ नका. मातोश्रीशी छेडछाड करू नका, २० फूट खाली गाडले जाल. हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका.” असा इशारा देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला.

आम्हाला वारंवार धमक्या देऊ नका –

याचबरोबर, “आज जी तुमच्या विषाला उकळी फुटलेली आहे, हिंदुत्वाच्या नावाने विष आहे हे खरं हिंदुत्व नाही. या तुमच्या विषाला उकळी फुटली असेल, तर ती तिथल्या तिथे दाबण्याची ताकद आजही शिवसेनेमध्ये आहे. आम्हाला वारंवार धमक्या देऊ नका, मी देखील नागपुरातच आहे. मी नागपुरातच आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला नागपुरातच राहायला सांगितलेलं आहे.” असंही संजय राऊत यांनी याप्रसंगी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay rauts warning to rana couplemsr

ताज्या बातम्या