मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच जे जे शक्य आहे आणि कायद्याच्या चौकटीत आहे ते सगळं दिलं जाईल असं स्पष्ट केलं आहे. तसं मराठा समाजाला आम्हीच सर्वाधिक न्याय दिला आहे, यापुढेही आम्हीच देणार असं म्हटलं आहे. आज जरांगेंच्या उपोषणाचा १२ वा दिवस आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची भूमिका मांडली आहे.
आंदोलन मोडीत काढायचं ही सरकारची भूमिका-जरांगे
मराठ्यांना संपवायचं आणि आंदोलन मोडीत काढायचं ही काही जणांची भूमिका आहे. त्यामुळे काही गोष्टी चालल्या आहेत असा आरोप मनोज जरांगेंनी केला. नाकर्तेपणा सिद्ध झाला आहे, राजकीय स्टंट करण्याची मानसिकता आहे तीच केली जाते आहे. उदय सामंत असो, प्रसाद लाड असो कुणीही असो तुम्ही स्पष्टपणे हरला आहात आणि तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही.
शिरसाट आणि उदय सामंत यांना दंगल घडवायची आहे-जरांगे
शंभूराज देसाई जे म्हणत आहेत की एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे ती मराठा समाजालाही रुचलेली नाही तर तसं काही झालेलं नाही. तुम्हाला ती रुचलेली नाही. मराठ्यांचं वाटोळं कुणी केलं? एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांकडून प्रमाणपत्रं रद्द करुन घेतली तेव्हा तुमच्याकडचे मराठा समर्थक कुठे गेले होते? तुम्ही जे म्हणता ना तुमच्याकडेही मराठा समर्थक आहेत कुठे होते ते तेव्हा? एकनाथ शिंदे ज्यांना रस्त्यावर आणत आहेत ते गप्प का बसले आहेत? प्रमाणपत्रं रद्द व्हायला लागली हे बोलणाऱ्या मराठ्यांना कळत नाही का? जातीकडे ध्यान देणार नाही का? तुमची जातच पक्ष आहे का? असे सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडू नये एकनाथ शिंदेंनी, लवकर संपतील. जे कोण उदय सामंत वगैरे संयमाची भाषा करणार असेल तर बिना संयमाचं काय करणार ते सांगा. उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये दंगल घडवणार आहेत. यांचं सगळं ठरलेलं आहे असाही गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला.
आमच्यात भांडणं लावू नका-जरांगे
तुम्ही पक्षातले सगळे आमदार, मंत्री एकत्र आले ना तरीही आमचं काही वाकडं करु शकणार नाही. साधा आमदार आहे ना त्याच्याकडे दहा-पाच गुंड आहेत. यांच्याकडे २००-४०० आहेत. त्यांना वाटत असेल की पैशांच्या जिवावर आम्ही यांचं वाकडं करु आम्ही ऐकणार नाही. पोरांच्या हातात दगड नाही मिळाले नाहीत तर नरडं फोडून खातील. धमक्याच दिल्या जात आहेत फक्त भाषा बदलली आहे. महाविकास आघाडीसहीत सगळे एकत्र या तुम्ही काही करु शकत नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.१२ सप्टेंबरला मी मुंबईत येणारच, तेव्हा सगळ्यांना मी बरोबर दाखवतो. तुमची तळमळ तुमच्या नेत्यासाठी असेल तर माझी तळमळ ही माझ्या मराठ्यांसाठी आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय.
