शिवसेनेतील बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी भाजपाच्या नेत्यांसमोर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतूक करताना शिरसाटांनी अडीच वर्षात मला मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीच पाहायला मिळाली नाही, असा दावा केला. यातून त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच भाजपाचे मंत्री अतुल सावे यांना तुम्ही नशिबवान आहात असंही म्हटलं. ते रविवारी (२१ ऑगस्ट) औरंगाबादमध्ये आपल्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

संजय शिरसाट म्हणाले, “या ठिकाणी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही. आम्ही मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. त्या माणसाची काम करण्याची पद्धत अतुल सावेंनी देखील पाहिली आहे. कितीही पत्रं आणा, तातडीने मान्यता देतात. मी सातारा देवळाईमध्ये जवळपास ७०-८० कोटी रुपयांची कामं केली आहेत. अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये आणले आहेत. अतुल सावेंनी कामाचं पत्र दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी लगेच स्वाक्षरी केली,” असं शिरसाटांनी सांगितलं.”

“मी अडीच वर्षात मुख्यमंत्र्याची स्वाक्षरीच पाहिली नाही”

“मी अडीच वर्षात मुख्यमंत्र्याची स्वाक्षरीच पाहिली नाही. त्यांना इतके पत्रं दिले, पण त्या पत्रांवर स्वाक्षरीच दिसली नाही. तुम्ही नशिबवान आहात,” असं म्हणत शिरसाटांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“उगाच माझ्याविरोधात कुणाला जमा करू नका”

भाजपा नेत्यासमोर बोलताना शिरसाट पुढे म्हणाले, “राजेंद्र जंजाळ म्हणाले आज मंचावर भाजपा आणि शिवसेनाही दिसते. निवडणुकीत देखील तसेच राहा. शितोळेंनाही सांगतो तसेच राहा. उगाच माझ्याविरोधात कुणाला जमा करू नका. आपल्याला ज्यांच्यासोबत लढायचं आहे ते बाकीचे लोकं आहेत. त्यांच्याशी आपण लढू. परंतु, एकजुट असली पाहिजे. आपलं एक महत्त्व असलं पाहिजे.”

“यांच्यातच फाटाफुट दिसते असं त्यांना वाटायला नको”

“नागरिकांमध्ये आपल्याविषयी संभ्रम निर्माण व्हायला नको. यांच्यातच फाटाफुट दिसते असं त्यांना वाटायला नको. म्हणून आज भाजपा-शिवसेनेचे नेते एकत्र आले. यामुळे शहरात एक वेगळा संदेश जाणार आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“अतुल सावे महाराष्ट्राचे मंत्री असले तरी…”

भाजपा मंत्री अतुल सावे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, “मी अतुल सावे यांना सांगतो की आज तुम्ही मंत्री आहात. त्याचा शहराला किती उपयोग होईल हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. दर आठवड्याला, १५ दिवसांनी एक बैठक आणि झालेल्या कामाचा आढावा घेण्याचं काम आपलं असलं पाहिजे. अतुल सावे शहराचे नागरिक आहेत. ते महाराष्ट्राचे मंत्री असले तरी, या शहराचे नागरिक आहेत. त्यामुळे बोलावलेल्या प्रत्येक माणसाच्या घरी जाणं देखील त्याचं काम आहे. ते सर्व मंत्र्यांनीही केलं पाहिजे, अशी माझी भावना आहे.”

“काही नसताना मी सगळ्या महाराष्ट्रात टीव्हीवर दिसतो”

“माझ्या गल्लीत कचरा उचलला जातो की नाही, माझ्या परिसरात लाईट लागल्या की नाहीत अशा मुलभूत गरजा नागरिकांच्या आहेत. हा त्याला शिव्या देतो, तो याला शिव्या देतो. मला तर खूप कंटाळा येतो. मी तर काही नसताना सगळ्या महाराष्ट्रात टीव्हीवर दिसतो,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: “मागून आले काय, मंत्री झाले काय…”, भाजपा मंत्र्यासमोरच आमदार संजय शिरसाटांनी बोलून दाखवली नाराजी

“एकमेकांची चेष्टा करून कधीही तुमचं महत्त्व वाढत नाही”

“एकमेकांची चेष्टा करून किंवा एकमेकांविरोधात बोलून कधीही तुमचं महत्त्व वाढत नाही हे लक्षात ठेवा. तुमचं महत्त्व वाढवायचं असेल तर त्याला कामाची जोड असली पाहिजे. मी केलेला रस्ता म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारसंघासाठी काय केलं याला महत्त्व असलं पाहिजे,” असंही शिरसाटांनी सांगितलं.