Sanjay Shirsat On Ganesh Naik : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. भाजपाचे नेते गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे नवी मुंबईचं राजकारण चांगलंच तापलं. यातच आता पुन्हा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. ‘भाजपाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण संपवून टाकू’, असं गणेश नाईकांनी भाष्य करत थेट एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा दिला.
त्यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी देखील गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. गणेश नाईक यांच्या वक्तव्यावरून संजय शिरसाट यांनी थेट भाजपाला इशारा दिला. ‘आम्ही बोलायला लागलो तर देशपातळीवर जाईल’, असं म्हणत ‘गणेश नाईकांचं जरा जास्त होतंय’, असं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“गणेश नाईकांचं जरा जास्त होत चाललं आहे. दरवेळी आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी डोक थोडं ठिकाणावर ठेवलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे ते सत्तेत आले आहेत. त्यांनी हे विसरू नये. नामोनिशाण मिटवण्याची भाषा कोणाला करत आहात? हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का, नामोनिशाण मिटवायला? आम्ही हिंमतीने आणि जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला काय आदेश घ्यायचे ते घ्या. मात्र, वारंवार तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करून तुम्हाला वाटत असेल की आपण कोणीतरी आहोत, पण असं नाही आणि ते समजण्याची चूक देखील करू नका”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
‘एकनाथ शिंदेंना हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका’
“आम्ही ऐकतोय याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही कळत नाही. महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही आम्हाला बोलायचं? हे आता सहन होणार नाही. याबाबत मी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. गणेश नाईक यांचं हे दरवेळचं असं झालं आहे. आम्ही साफ करू, आम्ही उखडून फेकून देऊ वैगेरे… तुम्ही कोणासाठी ही भाषा करत आहात? आम्ही त्याग केला आहे, त्यामुळे आजची ही सत्ता दिसत आहे. एकनाथ शिंदेंना एकदम हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
‘आम्ही जर बोलायला लागलो तर…’
“तुमची जर एवढीच ताकद असेल तर देवेंद्र फडणवीसांना सांगा आणि तुम्हाला एकदाच काय निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका. मात्र, वारंवार अशा प्रकारची भाषा चालणार नाही. मग जर आम्ही अशाच प्रकारची भाषा बोललो तर लगेच महायुतीत मिठाचा खडा? एखाद्या नेत्याबाबत बोलताना भान ठेवलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो हे नवी मुंबईचे डोंगर साफ करण्यासारखं नाही. हे एकनाथ शिंदे आहेत आणि ते जेव्हा निर्णय घेतात ते शांतपणे घेतात. आम्ही आजही यासाठी काही बोलत नाहीत की महायुतीत काही बिघाड होऊ नये. मात्र, जर तुम्हाला वाटत असेल की महायुतीत काही बिघाड व्हावा तर तुम्ही आव्हान देत बसा. मग आम्ही तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहोत. आम्ही जर उठाव केला नसता तर तुमचा पक्ष सत्तेत आला नसता. आम्ही जर बोलायला लागलो तर हा विषय देशपातळीवर जाईल”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.
“परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण…”; गणेश नाईकांनी शिंदेंना डिवचलं
“भाजपाने परवानी दिली ना तर यांचं नामोनिशाण संपवून टाकू, मी आज परत बोलतो आहे. भारतीय जनता पार्टी हा शिस्त पाळणारा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटलेलं नाही तरीही कार्यकर्त्यांनी सहन केलं आहे. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे”, असं म्हणत गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.
