Sanjay Shirsat On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. तसेच महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे. तरी अद्यापही लाडक्या बहि‍णींना १५०० ऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

लाडक्या बहि‍णींना १५०० ऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याचा निर्णय कधी होईल? याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, असं असतानाच आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही? यावर १५०० रुपयांवरून २१०० रुपये देता येणार नाहीत, ही वस्तूस्थिती असल्याचं संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची? हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. तसेच १५०० रुपयांचे २१०० रुपये (लाडक्या बहिणींचे) करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र, याचा आता अनेक लोक वेगळ्या अर्थाने बाऊ करतात. मग आता लाडकी बहीण योजना बंद होणार का? कमीच पैसे मिळतात का? असे सवाल विचारतात. पण आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत. सध्या राज्यावर जो आर्थिक भार आलेला आहे, त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

“भलेही यासाठी कर्ज काढावं लागलं तरी आम्हाला लाडकी बहीण योजना बंद करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे”, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं. तसेच लाडक्या बहि‍णींना दरमहा २१०० रुपये मिळणार की नाही? असं विचारलं असता आत्ता सध्या १५०० रुपये मिळतील एवढं नक्की, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.