Sanjay Shirsat On Balaji Kalyankar : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीत घडलेला एक किस्सा सांगत गौप्यस्फोट केला आहे. ‘तेव्हा आमदार बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता’, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच तेव्हा जर आमदारांची संख्या कमी पडली असती तर माझीही आमदारकी रद्द झाली असती, असंही संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“जेव्हा आम्ही बंडखोरी केली होती तेव्हा आम्ही गुवाहाटीला जाताना बालाजी कल्याणकरांनाही घेऊन गेलो होतोत. तेव्हा कल्याणकरांची आमदारकीची पहिली वेळ होती, तर माझी तिसरी वेळ होती. तेव्हा आमदार कल्याणकर तणावात होते. म्हणत होते की माझी ही पहिली वेळ, चूकून आमदार झालो आणि हे आम्हाला घेऊन चालले. परत मतदारसंघात गेलं तर काय होईल? जर आमदारकी रद्द झाली तर काय? जर काही झालं तर आलेली संधी गेली, असं म्हणत कल्याणकर तणावात राहायचे आणि जेवणही करत नसायचे”, असं संजय शिरसाटांनी सांगितलं.

“मग आम्ही त्यांना सांगायचो की बालाजी काही तरी खा, ते म्हणायचे की नाही नको. आम्ही सांगायचो की आम्ही आमचं राजकीय आयुष्य पणाला लावलं आहे. पण तरी ते जेवण करायचे नाही. मग एकदा तर कल्याणकर म्हणाले की मी आता हॉटेलवरून खाली उडीच मारतो. तेम्हा आम्हाला संख्या मोजायची पडली आणि कल्याणकरांना खाली उडी मारायची पडली होती”, असा किस्सा संजय शिरसाटांनी सांगताच एकच हशा पिकला.

“तेव्हा एखादा आमदार कमी जास्त झाला असता आणि आमची संख्या कमी पडली असती तर आमचीही आमदारकी रद्द झाली असती. त्यामुळे आम्ही दोन माणसं कल्याणकरांबरोबरच कायम ठेवायचो. कल्याणकरांना आम्ही सांगायचो की, आम्ही आमचं राजकारण पणाला लावतोय, उद्या काही झालं तर आम्ही डायरेक्ट वॉश आऊट होऊ. पण तू तर नवीन आहे तुला कोणीही माफ करेल. मात्र, हिंमत केल्याशिवाय काही होत नाही, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात”, असंही संजय शिरसाटांनी यावेळी सांगितलं.

“आज कल्याणकरांनी त्यांच्या मतदारसंघात जे काम केले आहेत, तेवढे कामे त्यांच्या आधी जे पाच आमदार झाले असतील त्यांच्या पेक्षा जास्त काम कल्याणकर यांनी केले. आमच्यापेक्षा कल्याणकर हुशार निघाले, कारण सर्वात जास्त निधी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आणला आणि दुसऱ्यांदा निवडूनही आले. आता त्यांना चिंताच राहिली नाही”, असं संजय शिरसाटांनी म्हणताच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.