scorecardresearch

मुंबईत भाजपाची ताकद वाढली? महापालिकेत शिवसेनेचा महापौर नसणार? संजय शिरसाट म्हणाले…

“महापालिकेची निवडणूक ताकदीनिशी लढवणार आहे, मात्र…” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.

sanjay shirsat
मुंबईत भाजपाची ताकद वाढली? महापालिकेत शिवसेनेचा महापौर नसणार? संजय शिरसाट म्हणाले…|

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. यासाठी भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) तयारी करण्यात येत आहे. तर, महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना ( ठाकरे गट ) ही सज्ज आहे. अशातच आता आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत भाजपापेक्षा शिवसेनेची ताकद कमी झाली आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.

“गेल्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. भाजपा आणि शिवसेनेत फक्त दोन जागांचा फरक होता. आता शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. जेव्हा एखाद्या पक्षाचं विभाजन होते, तेव्हा कार्यकर्ते एका किंवा दुसऱ्या बाजूला जात नसतात. त्यांच्यात फूट पडते. एकसंघ असते, तर वेगळी गोष्ट होती,” असं संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा : “काही झालं तरी…”, राहुल गांधींच्या घरी ‘त्या’ प्रकरणी पोलीस पोहचल्याने संजय राऊतांचा हल्लाबोल

“महापालिकेची निवडणूक ताकदीनिशी लढवणार आहे. मात्र, आमचा प्रयत्न एवढा राहिल की शिवसेना आणि भाजपाचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकला पाहिजे. त्यानंतर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष कोण होईल, हा दुय्यम भाग आहे. पहिली सत्ता ताब्यात घेणं महत्वाचं आहे,” असं शिरसाटांनी म्हटलं.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार नाही? असं विचारलं असता शिरसाटांनी सांगितलं, “शिवसेना आणि भाजपाची सत्ता येणार आहे. महापौरपदी कोण बसेल हे सांगू शकत नाही. पण, महापालिकेवर भगवा झेंडा असणार आहे.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंची शिवीगाळ सभा, तर एकनाथ शिंदेंची…”, शिंदे गटातील नेत्याचा टोला

खासदार, आमदार, नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आहे, मग ताकद कमी कशी? असं विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “ताकद कमी आहे, असं नाही. काही भागांत आम्ही कमी पडतो. मुंबई पालिकेची निवडणूक वेगवेगळ्या प्रभागांवर अवलंबून आहे. स्थानिक निवडणुका खूप अवघड असतात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 16:24 IST