Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या प्रकरणी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावलं. मात्र, चौकशीसाठी कुणाल कामरा हजर झाला नाही.

तसेच कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच दुसरीकडे कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी कुणाल कामराला मोठा इशाराही दिला आहे. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

कुणाल कामराच्या गाण्यानंतर राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटल्याच्या संदर्भात शिरसाट यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “कुणाल कामरा लोकांना गद्दार म्हणत आहे. मात्र, कामरा जेव्हाही मुंबईत येईल तेव्हा जशास तसं उत्तर दिलं जाईल. त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच होईल. तसेच कुणाल कामरा मुंबईत आल्यानंतर स्वागत करावंच लागेल. कारण तो एवढा मोठा व्यक्ती आहे, मोठा स्टार आहे. त्याचं स्वागत आम्ही जरूर करणार”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी आपल्या एका शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.