Sanjay Shirsat On Thackeray Group : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर शिवसेना ठाकरे गटाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचे दावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात मोठे पक्षप्रवेश होतील असा दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली होती. यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अर्धे आमदार आमच्या संपर्कात आहेत. फक्त एकनाथ शिंदे यांनी एक इशारा केला तरी ते आमदार आमच्याकडे येतील’, असं मंत्री संजय शिरसाट यांनी परभणी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात खळबळ उडली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका करत निवडणुकीत आलेल्या अपयशावरून घणाघात केला आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“राजकारणात नेहमी संयम पाळला पाहिजे. मात्र, ज्यांनी संयम सोडला त्यांची आज काय अवस्था झाली? हे तुम्ही पाहिलं आहे. जे भाषणे करायचे, जे बोलायचे, ज्यांच्याकडे ५६ आमदार होते. आताच्या निवडणुकीत ज्यांनी ९६ जागा लढवल्या. पण त्यातील २० जण निवडून आलेत. त्यातील अर्ध्यांपेक्षा जास्त आमदार आताही आमच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त इशारा केला तर ते आमदार लगेच आमच्याकडे येतील. अशी अवस्था त्यांची झाली आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

धाराशिवमध्ये रविवारी जिल्हा नियोजन समितीची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत एक सूचक विधान केलं होतं. ठाकरे गटातील काही नेते महायुतीबरोबर येऊ शकतात असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. तसेच यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा देखील उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाला धाराशिवमध्ये धक्का बसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, यानंतर धाराशिवमधील ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळून लावल्या.

उदय सामंत यांनी काय दावा केला होता?

मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाबाबत एक दावा केला होता. ते म्हणाले होते की, “शिवसेना ठाकरे गटामधून पुढच्या काही दिवसांत शिवसेना (शिंदे) पक्षात मोठे पक्षप्रवेश होतील. यामध्ये आमदार, खासदार आणि काही माजी आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश असेल”, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. दरम्यान, त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे ठाकरे गटाला खरोखर धक्का बसणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat on uddhav thackeray shivsena mla contact in shiv sena shinde group mahayuti gkt