Sanjay Shirsat On Uddhav Thackeray Shivsena : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेच्या (ठाकरे गट) सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारीवरून माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, खासदारांच्या बैठकीत असं काही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.’उबाठा गटाचे खासदार कोणत्यातरी गटात विलीन होण्याची शक्यता आहे’, असं मोठं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री संजय शिरसाट यांना विचारला. यावर शिरसाट म्हणाले की, “शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धूसफूसीच्या अनेक घटना समोर येत आहेत. राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदी यांना का दिली नाही, याची कारणं काय आहेत? यावर आम्ही बोलणार नाहीत. तसेच संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का सुचवलं? याचेही वेगळे कारणं आहेत. मात्र, ठाकरे गटातील अंतर्गत जी भांडणं सुरू आहेत, ते टोकाला गेले आहेत आणि याचा लवकरच स्फोट होईल”, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“खासदारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणं हा एक भाग आहे. पण मागच्यावेळी जो उठाव झाला होता, त्या उठावाचंही हेच कारणं होतं. मंत्र्यांना न भेटणं, आमदारांना न भेटणं, पदाधिकाऱ्यांना न भेटणं हा त्यांचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाला कंटाळूनच काही लोकांनी उठाव केला. आताही त्याच हालचाली केंद्रात खासदारांच्या सुरू आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी बैठक घेतली असावी. पण लवकरच हे खासदार कोणाच्यातरी गटात विलीन होतील अशी शंका उपस्थित होत आहे”, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन टायगरच्या हालचाली

शिवसेनेचं (शिंदे) ऑपरेशन टायगर लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “याबाबत मला कल्पना नाही. मात्र, आमच्याकडे जे येतात त्यांची योग्यता पाहून एकनाथ शिंदे निर्णय घेतात. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना जपणारे नेते आहेत. त्यामुळे अनेक पक्षाचे नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे खासदारही येतील अशी शक्यता नक्की आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.