शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२७ मार्च) मालेगाव येथे मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते या सभेत देखील बंडखोर आमदारांना गद्दार म्हणाले, तसेच खोके घेऊन बंडखोरी केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आता शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “गद्दारी आम्ही नव्हे तर त्यांनी केली. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरसाट म्हणाले की, “२०१९ साली ज्या विचारांवर आम्ही निवडणूक लढवली त्या विचारांचा धागा पकडून आम्ही काम करत आहोत. हे आम्हाला गद्दार म्हणतायत, पण गद्दारी तर यांनीच केली. हिंदुत्वाशी गद्दारी केली, तसेच ज्यांच्याबरोबर गेले (काँग्रेस-राष्ट्रवादी) ते यांना विचारायला तयार नाहीत, यांची साधी विचारपूससुद्धा करायला तयार नाहीत. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, सत्ता महत्त्वाची की हिंदुत्व महत्त्वाचं? कारण भगवा वाचवण्याचं काम आम्ही करतोय.”

संजय शिरसाट म्हणाले की, “हे खंडोजी खोपडे कुणाला म्हणतायत? वेळ आल्यावर आम्ही सर्वांना दाखवून देऊ की, गद्दारी कोणी केली, खोके कोणी घेतले, कुठे घेतले आणि कसे घेतले. यांना आता बोंबलू द्या. वेळ येऊ द्या, ज्याने खोके दिले त्याला उभं करू आणि ज्याने घेतले त्यालाही उभं करू.”

हे ही वाचा >> “राहुल गांधी सावरकरांबद्दल करत असलेल्या वक्तव्यांमुळे..”, ठाकरे गटाचा इशारा; म्हणे, “आधी स्वत:च्याच पक्षात…!”

शिरसाटांचा राऊतांना टोला

दरम्यान, बंडखोरांनी गद्दारी करून सरकार पाडलं, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत गांडूळ आहेत, ते दोन्ही बाजूने असतात. जे वाक्य ते उद्धव ठाकरेंबद्दल बोलले तेच वाक्य शरद पवारांबद्दल बोलतील. त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat slams uddhav thackeray over rebel mla asc
First published on: 27-03-2023 at 08:24 IST