Nishikant Dubey vs Arvind Sawant Parliament Argument on Aditya Thackeray : केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण) लागू करण्यासाठी १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात अधिवेशनात महिला आरक्षणाशी निगडीत तीन विधेयकांवर चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेवेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. अरविंद सावंत बोलत असताना दुबे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने सभागृहात गदारोळ झाला.
नेमकं काय झालं?
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरील चर्चेत बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सांवत यांनी भाजपावर टीका करताना कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंग यांची नावे घेतली. अरविंद सावंत म्हणाले की, “एक आमच्या एक आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एक लेख लिहिला, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की यांचे (महायुतीचे) महाराष्ट्रात सरकार आहे आणि महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्री म्हणाले की, माझ्याकडे महिला अधिकार्यांना पाठवायचं नाही आणि हे महिलांच्या सन्मानाच्या, आरक्षणाच्या गोष्टी करतात. महिलांच्या संरक्षणावर बोला.”
“आपण कुलदीप सेंगर कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे हे विसरू नका. ब्रिजभूषण सिंह यांना विसरू नका. हे महिलांचा सम्मान करणारे लोक आहेत का? आणि हे महिलांच्या सन्मानाबद्दल बोलतात,” असा उल्लेख जेव्हा सावंत करताच सभागृहात गोंधळाला सुरूवात झाली. यावर “तु्म्हाला बलात्कारी खूप प्रिय आहेत का?” असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला.
अरविंद सावंत यांच्या या विधानानंतर भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी उभे राहत प्रत्युत्तर दिले.दुबे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उल्लेख करत केलेल्या विधानानंतर गोंधळ आणखीनच वाढला. दुबे म्हणाले की, “जर हे कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण सिंह यांच्याबद्दल बोलणार असतील तर, आदित्य ठाकरे यांच्याबद्दलही चर्चा होईल. त्यांनीही अभिनेत्रीला मारून टाकलं.”
दुबे यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी उभे राहत या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुबे यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. यावेळी अरविंद सावंत यांनी निशिकांत दुबे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. यानंतर लोकसभा पीठासीन जगदंबिका पाल यांनी दुबे यांचे विधान हे सभागृहाच्या कामकाजातून हटवले जाईल असे स्पष्ट केले.
“मी गुन्हेगारांचं नाव घेतलं, जे तुरूंगात गेलेले लोक आहेत. कोणाला बदनामच करायचं असेल तर मी तडीपारचं नाव घेऊ का? ते तडीपार होते. एप्स्टिन फाईलचं नाव घेऊ का?” असे अरविंद सावंत म्हणाले.
