वाई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा महानुभाव व जैन पंथीयांची काशी असणाऱ्या फलटण मुक्कामी

आज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा,स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण होते.

sant dyanewshwar maharaj palkhi
( प्रतिनिधिक छायाचित्र )

विश्वास पवार
चला पंढरीस जाऊ। रखुमादेवी वरा पाहू॥
डोळे निवतील कान। मना तेथे समाधान॥
संता महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥
ते तीर्थांचे माहेर। सर्व सुखांचे भांडार॥
जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक॥

तुकोबारायांच्या अभंगातील या ओळींप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्ञानोबा माऊली तुकाराम….तुकाराम’ सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा आज महानुभाव व जैन पंथीयांची काशी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साताऱ्यातील फलटण नगरीत दोन दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला.

तरडगाव येथील पालखी तळावरुन सकाळी ६ वाजता सोहळ्याच्या प्रस्थानानंतर हा सोहळा सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेवून व पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत संध्याकाळी फलटण शहरात दाखल झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी व मान्यवरांनी स्वागत केले.फलटण येथे दोन दिवस पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. रविवारी (दि ३) रोजी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवुन हा सोहळा सातारा जिल्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी दाखल होणार आहे.

माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह लाखो भाविकांच्या जनसमुदायाचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी विसावला. वारीत सहभागी असलेल्या लाखो वारकऱ्यासह शहर व तालुक्यातील नागरीकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरती नंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी मोठ्या रांगा लावल्या. फलटण शहरातील ऐतिहासिक राम मंदिर व जबरेश्वर मंदिर येथेही दर्शनासाठी वारकरी व महिलांनी रांगा लावल्या होत्या.

कालपासूनच फलटण येथे अनेक वारकरी यांनी फलटण तेथे येण्यास सुरुवात झाली होती. आज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा,स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण होते. पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकऱ्याचे सकाळपासुनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका या मुळे अवघे फलटण शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकानी मोफत चहा व बिस्किटे, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय तसेच मोफत आरोग्य सेवा, मोबाईल फोन चार्ज करुन देणे, आदी उपक्रम वारकऱ्यासाठी राबविण्यात आले होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्याच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sant dnyaneshwar maharaj palkhi sohala mahanubhav at kashi phaltan amy

Next Story
“…मग आता अध्यक्षांची निवडणूक कोणत्या कायद्यानुसार?” बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांना खोचक सवाल
फोटो गॅलरी