सोलापूर : आषाढी यात्रेसाठी विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी बाळगून दूर अंतरावरून मुखी विठ्ठलनाम घेत पायी चालत निघालेल्या श्रीक्षेत्र संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी तुळजापूरमार्गे सोलापूर शहरात दाखल झाला. रूपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी चौकात पालखी सोहळ्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासह हजारो भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले. शेगावचा राणा सोलापुरात दोन दिवसांसाठी विसावण्याचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे.

दुपारी सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात हा पालखी सोहळा महाप्रसाद आणि विश्रांतीसाठी विसावला. नंतर सायंकाळी रविवार पेठेतील पूजन प्रशालेत रात्रीच्या मुक्कामासाठी या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. शहरात दोन दिवस मुक्काम करून श्री गजानन महाराज पालखी समस्त सोलापूरकरांची सेवा घेऊन मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

टाळ-मृदंगाच्या ठेक्यात, ‘गण गण गणात बोते’ हा संत गजानन महाराजांचा आवडता मंत्र उच्चारत आणि भजन व अभंगांसह विठ्ठलाच्या भावाचा गजर करीत हा शिस्तबद्ध पालखी सोहळा काल शनिवारी सायंकाळी धारासूर जिल्ह्याची शीव ओलांडून सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. रात्री उळे गावी मुक्काम करून रविवारी, दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूर शहरात दाखल झाला. तोपर्यंत हजारो भाविक श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाची आस घेऊन पालखी मार्गावर थांबले होते.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार आदींनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन स्वागत केले. महिला भाविकांनी उत्साही आणि भक्तिमय वातावरणात फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.

पाणी गिरणी चौकात सकाळच्या न्याहरीसाठी पालखी सोहळा काही वेळ विसावला होता. सातशे वारकऱ्यांनी न्याहरीचा आस्वाद घेतल्यानंतर पालखी सोहळा वाजत गाजत पुढे मार्गस्थ झाला. तुळजापूर वेस, कस्तुरबा भाजी मंडई, सम्राट चौक मार्गे दुपारी सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर त्यातील सर्व वारकरी आणि सेवेकरी यांनी पिठले भाकरी महाप्रसादाचा लाभ घेतला. काही वेळ विश्रांती घेऊन हा पालखी सोहळा रविवार पेठेतील कुचन प्रशालेकडे निघाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्रीच्या मुक्कामानंतर उद्या सोमवारी सकाळी पालखी सोहळा पारंपरिक मार्गावरून सात रस्ता-मोदी खान्यातील मंगल कार्यालयात दिवसभर विसावणार आहे. सुमारे ७५० किमी दूर अंतरावरचा पायी प्रवास करीत निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये भागवत धर्माच्या उंच भगव्या पताका, अभंग, भजने सादर करताना सोबत टाळ, चिपळ्यांची लयबद्ध साथ, अशा भारावलेल्या भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांची गर्दी उसळली होती.