कर्जत : इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाचा गंभीर परिणाम आपल्या देशावर होईल, पुढील काळामध्ये रोगराईमध्ये वाढ होईल. अतिवृष्टी व पुराचा धोका, उद्योग व्यवसायामध्ये तेजी-मंदीमुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण होईल, राजा व प्रजा यांच्यामध्ये मोठे वाद-विवाद होतील, विरोधी भावना वाढेल, भूकंप आणि आग लागण्याच्या मोठ्या घटना घडतील… असे भाकित कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरीमध्ये वर्तवण्यात आले आहे.

गोदड महाराज यांनी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी विविध ग्रंथांचे लिखाण केले. यामध्ये प्रत्येक वर्षी पाऊस, पिके, पाणी, संकटे, राजकीय व सामाजिक घटना याची एक संवत्सरी (६० वर्षांची) लिहिलेली आहे. दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी महाराजांच्या समाधी मंदिरात त्यावर्षीचे भाकीत वाचण्यात येते. हे भाकीत खरे होते अशी भाविकांची समजूत आहे. हे भाकीत ऐकण्यासाठी आज, गुरुवारी सकाळीपासूनच मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

मंदिराचे प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील यांचे वाजतगाजत मंदिराकडे आगमन झाल्यानंतर मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी दरवर्षीप्रमाणे या भाकिताचे वाचन केले. या संवत्सरीच्या भाकितावर शेतकरी शेतीच्या कामाची नियोजन करतात.

यंदा पुढीलप्रमाणे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यावर्षीच्या संवत्सराचे नाव ‘पराभव संवत्सर’ असे आहे. याचा स्वामी राहू गुरु आहे. खरीप हंगामासाठी चांगला पाऊस सांगितला आहे. मात्र दुसरीकडे धान्य संचय काही ठिकाणी करावा लागेल. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन या चार महिन्यांमध्ये परिस्थिती मात्र चांगली होईल, पाऊसही चांगला पडेल. मान्सून वेळेवर येईल, महाराष्ट्रात लुग नक्षत्रात पाऊस सुरू होईल, मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस असेल, काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असून त्यावेळी पुराचा मोठा धोका निर्माण होईल, काही भागांमध्ये ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. अनेक नक्षत्रांमध्ये यावेळेस चांगला पाऊस सांगितला आहे. मात्र तो सर्व समावेशक पडणार नसून काही ठिकाणी खंडित पाऊस पडणार आहे.

भाकितानुसार शेती कामाचे नियोजन

संत सद्गुरु गोदड महाराज यांनी विविध पद्धतीचे लिखाण केले आहे, यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संवत्सरी लिहून ठेवली आहे. दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी याचं वाचन करण्यात येते. शेतकऱ्यांमध्ये याविषयी मोठी उत्सुकता असते. या भविष्यानुसारच शेतीच्या कामाची नियोजन करण्यात येते आणि आजपर्यंत हे भाकीत खोटे ठरले नाही, असा आमचा विश्वास आहे. -सुरेश ख्रिस्ती, भाविक, कर्जत.