सोलापूर : संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील वारदवाडी, शेंद्री येथे आगमन होताच उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, रांगोळ्यांच्या पायघड्या अशा वातावरणात वरूणराजानेही हजेरी लावून संत मुक्ताई पालखीचे स्वागत केले.
परंडा-बार्शी मार्गावर धारवाडी फाट्यावर संत मुक्ताई पालखीचे आगमन होताच बार्शीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी श्रींच्या पादुका डोईवर ठेवून भाविकांच्या दर्शनासाठी पुढे आणल्या. प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी पादुकांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, शेंद्रीचे सरपंच शिवाजी शिंदे आदींनी हजेरी लावली होती. प्रांताधिकारी पडदुणे यांच्यासह तहसीलदार एफ. आर. शेख, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण आदींनी संत मुक्ताई महाराजांच्या मूर्तीला भक्तिपूर्वक साडी चोळीचा आहेर केला. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे यंदाचे ३१६ वे वर्ष आहे. परंडा तालुक्यातील वाकणी येथे जेवण झाल्यानंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पावले बार्शीच्या दिशेने झपाझप पडत होती. संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सम्राट पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. या पालखी सोहळ्यात अग्रभागी दोन अश्व आहेत. ८०० महिला आणि ६०० पुरूष वारकऱ्यांसह विणेकरांचा उत्साही सहभाग दिसून येतो.