बारामती : ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष आणि विठ्ठलभेटीची आस घेऊन निघालेला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीनगरीत विसावला. संपूर्ण बारामती भक्तिरसात न्हाऊन निघाली. परंतु, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यंदाच्या सोहळ्यात नसल्याची सल बारामतीकरांच्या मनात आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यातील वातावरण हे भावुक झाले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती शहरामध्ये भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्या वतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशारे माने, मुख्याधिकारी पंकज भुसे उपस्थित होते.
दर वर्षी आषाढी वारीच्या काळात बारामतीचे रूप काही वेगळेच असायचे. ‘पालखी सोहळ्यात येणाऱ्या शेवटच्या वारकऱ्यालाही कोणतीही कमतरता भासता कामा नये, प्रशासकीय यंत्रणेपासून ते अगदी सामान्य नागरिकापर्यंत सगळ्यांनी वारकऱ्यांच्या सेवेत तत्पर राहिले पाहिजे,’ अशी सक्त ताकीद आणि नियोजन अजित पवार यांचे असायचे. पालखी येण्यापूर्वीच बारामती शहर स्वच्छ आणि सुसज्ज केले जायचे. मात्र, यंदा पालखीच्या स्वागतासाठी अजित पवार नसल्याने बारामतीमधील वातावरण भावुक झाले. अजित पवार यांना गमावल्याचे दुःख असतानाच अजितदादांनीच शिकवलेला कर्तव्याचा आणि सेवेचा वारसा बारामतीकरांनी वारकऱ्यांची सेवा करून जपला.
काटेवाडीत रिंगण
पालखी सोहळ्याचे काटेवाडी येथे दुपारी तीन वाजता रिंगण होणार आहे. त्यानंतर पालखी इंदापूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
