संतोष बांगर हल्ला प्रकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अगदी शेवटच्या क्षणी दाखल झालेले आमदार म्हणून ओळख असणाऱ्या संतोष बांगर यांच्या ताफ्यावर रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या हल्ला प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिली आहे. या प्रकरणात एकूण १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

अमरावतीमधील या हल्ला प्रकरणामध्ये शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणामध्ये १५-२० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकसत्र सुरु असल्याचं वानखडे यांनी सांगितलं. “काल लाला चौकामध्ये आमदार बांगर आले होते. त्यांच्या कारवर काही लोकांनी हाताने थापा मारला आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आम्ही १५ ते २० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे,” असं ठाणेदार वानखडे यांनी सांगितलं.

तसेच पुढे माहिती देताना, बांगर यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये “११ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटकसत्र सुरु आहे.आरोप निश्चिती करुन आरोपींना न्यायालयासमोर हजर करणार आहोत,” असंही ठाणेकार वानखडे म्हणाले.

नक्की वाचा >> वाशीम: माझ्या मारहाणीचा ‘व्हिडीओ व्हायरल‘ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ, आमदार संतोष बांगर म्हणाले, महिलांवर…

बांगर हे रविवारी दुपारी अंजनगाव सुर्जीमधील देवनाथ मठात सहकुटुंब देव दर्शनाकरिता आले होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार बांगर हे मठात येणार असल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक सायंकाळी लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ‘पन्नास खोके एकदम ओके’चे नारे देत शिवसैनिकांनी गाडीवर हातमुक्क्यांनी मारत घोषणाबाजी केली. यावेळी बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय घडत आहे हे कळलत नव्हतं.