Santosh Pandit Video Post: समाजमाध्यमात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरसेविकेविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पंडित यांनी पहिली व्हिडीओ पोस्ट केली आहे. “सगळ्या परिस्थितीत मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो”, असा खुलासा पंडित यांनी केला आहे. तसेच, “कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो”, असा पुरुच्चार त्यांनी केला.
व्हिडीओत संतोष पंडित काय म्हणाले?
“गेल्या १०-१५ दिवसांत माझ्याबरोबर जो प्रसंग घडला, मी १०-१५ दिवस लॉकअपमध्ये होतो. या सगळ्या परिस्थितीत मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो. तुरुंगात बाहेरची माहिती मिळत नव्हती त्यामुळे सगळं काम थांबवावे लागतंय की काय? या चिंतेत मी होतो. पण, बाहेर आल्यानंतर सोशल मीडियाची मला साथ मिळाली आणि माध्यमांनी देखील सहकार्य केले”, असे संतोष पंडित म्हणाले.
हात जोडून मागितली माफी
“मी जनसामान्यांच्या भल्यासाठी काम करत असतो. यात जनसामान्यांच्या भावना दुखाव्यात असा माझा कोणताही उद्देश नसतो पण, जनसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मनापासून, हात जोडून माफी मागतो. माझ्या तुमच्या भावना दुखावण्याची इच्छा नाही”, अशा शब्दात संतोष पंडित यांनी भूमिका मांडली.
संवैधानिक अधिकार बजावत राहणार – पंडित
दरम्यान, यापूर्वी त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, “माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, पण कोणाला चुकीचे वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागतो”, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, “मी माझा संवैधानिक अधिकार बजावत राहणार, थांबणार नाही”, असेही स्पष्ट केले आहे. “मी जे काही करतोय तो माझा संवैधानिक अधिकार आहे. मी माझा अधिकार बजावत असतो. पहिल्यांदाही तो बजावत होतो आणि यापुढेही बजावत राहणार”, असेही पंडित यांनी सुटकेनंतर भूमिका मांडली.
