पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका नगरसेविकेविषयी अवमानकारक भाषेचा वापर केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. सुटकेनंतर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यापुढील काळातही लोकांच्या समस्यांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले; मात्र आपल्या वक्तव्यातील अपशब्दांबद्दल माफी मागत भाषेमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, कारागृहातील भयंकर परिस्थितीचा अनुभवही त्यांनी बोलून दाखवला.

मी पोलिसांचे मनापासून आभार मानतो..

पोलिसांनी खूप तत्परतेने कारवाई केली. मी असं म्हणणार नाही की माझ्यावर अन्याय झालाय, पण ज्या प्रकारे माझ्या बाबतीत केलं तेच इथून पुढेही पोलीस करतील असा मला विश्वास आहे, असे पंडित म्हणाले.

मी हे काम तर पोलीस खात्यासाठीच करतो

पंडित पुढे म्हणाले की, लोकांना असं वाटतं की मी जनतेचे विषय मांडतो मात्र खरं असं आहे की मी पोलीस खात्याचंच काम करतो, मी पोलिसांची प्रतिमा चांगली व्हावी म्हणून काम करतो.

तुरुंगात काय अनुभव आला?

पंडितांनी सांगितलं की मी ५ दिवस पोलीस कस्टडीमध्ये होतो. या सगळ्या दिवसांमध्ये मला डिप्रेशन येत होतं. हे सगळं बंद करावं की काय असं वाटत होतं. पण मी जेव्हा बाहेर आलो आणि सगळ्या लोकांचा जेव्हा प्रतिसाद पाहिला आणि मला मीडियाने जी साथ दिली ते पाहून मला ताकद मिळाली. आता नाही थांबणार, असे सांगताना संतोष पंडित भावूक झाले होते, रडत होते. लोकांची जर अशीच साथ राहिली तर तुम्ही कुठेही टाका आपली तयारी आहे, असेही पंडित म्हणाले.

तुरुंगात झोप लागली का?

हो, तुरुंगात झोप लागली. आपण घाणीत पाय टाकला तर आपल्यालाही घाण लागणारच. घाण साफ करण्याचंच मी काम करतोय. तुरुंगात सुद्धा मला अनेक जणांनी ओळखलं, त्यांच्या व्यथा त्यांनी तिथे मला सांगितल्या, असे पंडित म्हणाले.

तुरुंगात असताना पोलिसांनी कशी वागणूक दिली?

पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर बोलताना पंडित म्हणाले, पोलीस खूप छान आहेत. त्यांनी मला काहीच विचारलं नाही. पाच दिवस माझ्याशी अगदी प्रेमाने वागत होते. त्यांनी मला व्यवस्थित सांभाळलं. पोलीस खातं ग्रेट आहे.

कोथरूड पोलीस स्टेशनमधली आतली गोष्ट सांगतो..

माझ्यावर गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाला. पण तिथे लॉकअपच नाहीये. ही मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतोय. माझ्यासारख्या एवढ्या मोठ्या आरोपीला ज्याला रात्री-अपरात्री पकडलं त्याला ठेवायला त्यांच्याकडे जागा नव्हती हे बघून मला वाईट वाटलं, असेही पंडित म्हणाले. नंतर त्यांनी मला खडकी, येरवडा इथल्या तुरुंगात ठेवलं, असंही पंडितांनी सांगितलं. पोलिसांनी पहिल्या दिवशी मला येरवडा तुरुंगामध्ये ठेवलं, दुसऱ्या दिवशी खडकीमध्ये, तिसऱ्या दिवशी पुन्हा येरवडामध्ये, चौथ्या दिवशी पुन्हा खडकी स्थानकातील लॉकअपमध्ये मला ठेवण्यात आलं, अशी माहिती संतोष पंडित यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.