नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करू दिले नाहीत. यासंदर्भातली एक इंस्टाग्राम पोस्ट संयोगीताराजे यांनी केली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या (शनिवार) दुपारी ३ वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात आंदोलनाची हाक दिली आहे. त्याआधी त्यांनी एक व्हिडीओ आणि एक ट्वीटही प्रसिद्ध केलं आहे. ज्यांच्या घटनेवर विश्वास आहे त्यांनी या निषेध आंदोलनात सहभागी व्हावं असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट?

मी धर्माभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी क्षुद्र आहे. आणि क्षुद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगीताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखिल अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या.या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले.

महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलंच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजात बाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकविण्यासाठी पुढे केले. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट रचला गेला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेण-गोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.

पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणुसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहीले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन क्षुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना क्षुद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे.

या देशाच्या घटनेत,बाबासाहेबांच्या संविधानात विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी ३.०० वाजता यावे.आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे.

महंतांनी व्यक्त केली दिलगिरी

नाशिकमधल्या काळाराम मंदिरात कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे यांचा पूजा विधीवरून महंत सुधीरदास पुजारी यांच्याशी वाद झाल्याचे समाज माध्यमातून उघड झाले आहे. यासंदर्भात महंत सुधीरदास यांनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याची शक्यता व्यक्त करीत या प्रकरणात छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे. लवकरच कोल्हापूर येथे थोरले शाहू महाराज यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्यासमोर निवेदन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanyogitaraje viral post jitendra awhad will protest in kalaram temple in nashik scj
First published on: 31-03-2023 at 20:10 IST