राहाता: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून १२२ कोटी ३४ लाख व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी दिली.
‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीचा मोठा लाभ विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे, असे स्पष्ट करून मंत्री विखे यांनी सांगितले की, राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने सारथी संस्थेला नेहमीच भरीव निधी दिला आहे. याच अनुषंगाने संस्थेच्या वसतिगृहांच्या बांधकामासाठी १२२ कोटी ३४ लाख ६० हजार रुपयांच्या निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५०० विद्यार्थी व ५०० विद्यार्थिनी अशा एकूण १ हजार विद्यार्थी क्षमतेच्या ८ विभागीय वसतिगृहांच्या उभारणीचे काम आता पूर्णत्वास जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही सर्व वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष सेवेत उपलब्ध होतील, अशा दृष्टीने जलदगतीने नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.
तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबाबत माहिती देताना मंत्री विखे म्हणाले की, महामंडळासाठी तब्बल ७५० कोटी रुपयांची भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी महामंडळाला ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता नव्याने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महामंडळास आणखी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजातील तरुणांच्या व्यावसायिक स्वप्नांना आणि नवउद्योजकांना मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
