खरबी बेलवाडी गटग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठय़ाच्या कामाचा जि. प.कडून मिळालेला ६ लाखांचा धनादेश देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच व अन्य एक अशा तिघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली.
या ग्रामपंचायतीचा सदस्य तथा पाणीपुरवठा सचिव परमेश्वर मांडगे यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी मिळालेल्या ६ लाख ३४ हजारांचा निधी जि. प.मार्फत ग्रामपंचायतीला प्राप्त झाला होता. ही रक्कम काढण्यास धनादेशावर सरपंचाने सहीसाठी ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यातील १० हजारांची रक्कम तक्रारदार मांडगे याने बुधवारी सरंपच रामेश्वर काशिराम शितोळे, उपसरपंच सय्यद रफिक सय्यद हुसेन यांना दिली. उपसरपंचाने ही रक्कम गावातील गोिवद नवसाजी िशदे याच्याकडे दिली. मात्र, याच वेळी सापळा लावलेल्या लाचलुचपतच्या पथकाने लाचेच्या रकमेसह सरपंच शितोळे, उपसरपंच रफिक व िशदे या तिघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया िहगोली शहर पोलिसांत उशिरापर्यंत चालू होती.