हिंगोली: कळमनुरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार संतोष बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईच्या प्रश्नावर सोमवारी पार पडलेल्या बैठकीस उपस्थित सरपंच आणि ग्रामस्थांनी पाणीटंचाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला. धानोरा आणि  मोरवाडीसह २५  गावपाणी पुरठय़ाचा मुद्दाही चांगलाच गाजला. आखाडाबाळापूर, सांडस, माळधावंडा, धानोरा,डोंगरगावपूल, देवजना, भुरक्याचिवाडी या गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या प्रश्नावर बैठकीत चीड व्यक्त केली. आखाडाबाळापूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी करून तसा प्रस्तावही पंचायत समितीकडे पाठविला, मात्र तो अद्याप प्रलंबित असल्याबद्दल सरपंचांनी संताप व्यक्त केला तर विनोद बांगर यांनी तत्काळ टँकर सुरू झाला नाही तर मनसेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना इतक्या उशिरा पाणी टंचाईच्या प्रश्नावर बोलाविलेली बैठक म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार असल्याची टीका आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी यावेळी केली. तर आमदार संतोष बांगर यांनी विहीर आणि कूपनलिका अधिग्रहण प्रस्ताव प्रशासनाने तत्काळ मंजूर करावेत अशी मागणी केली. 

डोंगरगावपूल, भुरक्याचीवाडी, कुर्तडी, भुनेश्वर, देवजना या गावातील सरपंच, ग्रामस्थांनीही पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगून काही पाणीपुरवठा योजनेला विजेच्या प्रश्नामुळे अडथळा येत असल्याचा आरोप केला. तीन तास चाललेल्या या बैठकीत आमदार बांगर सुरुवातीला एक तास बैठकीत उपस्थित होते. ते बैठकीतून बाहेर पडतात न पडतात तोच आमदार सातव यांचे बैठकीत आगमन झाले. त्यांनी पाणी टंचाईच्या मुद्दय़ावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.