राहाता: ‘सारथी’ संस्थेमार्फत पूर्व प्रशिक्षणासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) १०० जागांवरून ४०० तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ४०० जागा वरून १ हजार जागा निर्माण करण्यास राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने मान्यता दिल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी दिली. याबरोबरच ‘सारथी’ने उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू करावेत, यासाठी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे मार्गदर्शन घ्यावे, अशीही सूचना केली आहे.
मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सारथी संस्थेच्या संचालकांची तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी विखे बोलत होते. ‘सारथी’चे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे आदी उपस्थित होते. उपसमितीचे अध्यक्षपद विखे यांनी स्वीकारल्यापासून झालेली ही नववी बैठक होती. बैठकीत मंत्री विखे यांनी ‘सारथी’मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा, उपलब्ध नीधीचा आढावा घेतला. व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे यांनी ‘सारथी’च्या उपक्रमांची माहिती दिली.
‘सारथी’च्या उपक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते सर्व पाठबळ देण्याबाबत मंत्री विखे यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. राज्य सरकारने सन २०२६- २६ आर्थिक वर्षात ५१५ कोटी रुपयांची तरतूद केली होती, त्यापैकी ४५२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. पुरवणी मागण्यांमध्येही ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.
सारथी संस्थेमार्फत राज्यात आठ वसतिगृहे उभारण्यात येत असून यापैकी सहा वसतिगृहाची कामे पूर्ण होत आहेत. या वसतिगृहांमध्ये ६००० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल, या वसतीगृहांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करावीत तसेच वसतीगृहांचे व्यवस्थापन नामांकित संस्थांकडून करण्याच्या सूचनाही विखे यांनी बैठकीत दिल्या.
३४ योजनांसाठी २२२ कोटी खर्च
सारथी संस्थेमार्फत सन २०२५-२६ मध्ये एकूण ३४ प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या. यासाठी ४८ हजार ३८१ मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील लक्षित गटाला एकूण २२२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली तसेच स्पर्धा परीक्षा व पूर्वपरीक्षणात प्रवेश घेतलेल्या एकूण ११७९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले तसेच देशांतर्गत १६४ शिष्यवृत्तीधारक, कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षित झालेल्या १० हजार २०९ अशा एकूण ११ हजार ९१५ प्रशिक्षित प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही मंत्री विखे यांनी सांगितले.

