रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपेक्षित कातकरी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या नव्या पिढीला शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी ‘शोषितमुक्ती अभियान’ ही संस्था अविरत कार्य करत आहे.
सामाजिक कार्यकर्ते उदय आईर यांच्या पुढाकाराने वेताळ बांबार्डे येथे सुरू झालेल्या वसतिगृहाच्या माध्यमातून आज ९२ आदिवासी मुले-मुली प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विविधांगी विकास घडवून आणत आहेत.
कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये कातकरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यापैकी पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील या समाजाची परिस्थिती सरकारी योजना चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्यामुळे तुलनेने बर्यापैकी सुधारली. पण, सिंधुदुर्ग जिल्हा याबाबतीत अजून मागासलेलाच आहे.
जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये एकूण ३४ कातकरी वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये सुमारे साडेआठशे कुटुंबे असून एकूण लोकसंख्या चार-साडेचार हजार आहे. पण, पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे शिधापत्रिका किंंवा मतदार ओळखपत्रसुद्धा नव्हते. पण, रायगड जिल्ह्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या उदय आईर या तरुणाने कुडाळ तालुक्यात काम करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन दशकांच्या काळात उदयने चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे सुमारे चार हजार आदिवासींना विविध प्रकारचे दाखले मिळाले, तर सुमारे साडेचारशे आदिवासी कुटुंबांना घरकुले मिळाली.
तालुक्यातील वेताळ बांबार्डे या ठिकाणी कातकरी आदिवासींच्या मुलांसाठी २०१५ मध्ये वसतिगृह सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षी २२ मुले असलेल्या या वसतिगृहात आज मुला-मुलींची एकूण संख्या ९२ वर पोहोचली आहे. यापैकी ५० जण माध्यमिक, तर ४२ जण प्राथमिक शाळांमध्ये आहेत. यंदा या मुलांपैकी दोन विद्यार्थी अकरावी, तर तिघे जण बारावीत शिक्षण घेत आहेत.
पत्नीसह पाच सहकार्यांच्या मदतीने उदय वसतिगृहातील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपक्रम राबवतो. मात्र, विविध पातळ्यांवर प्रयत्न करूनही कोणतीच शासकीय मदत मिळत नसल्याने खासगी कंपन्यांचे सीएसआर किंवा व्यक्तिगत देणग्यांच्या बळावर तो दरमहा सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च भागवत आहे. मुलांच्या विविधांगी विकासासाठी आवश्यक व्यायामशाळा, वाचनालय अभ्यासिका, ई-लर्निंगची सुविधा इत्यादींसाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे.
