जळगाव : समाजातील दुर्लक्षित घटकांना केवळ मदत न करता त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे करणे, यासाठी कार्यरत असलेली अमळनेर तालुक्यातील ‘आधार’ बहुउद्देशीय संस्था महिलांसह बालके, एचआयव्हीसह जगणार्या व्यक्ती आणि समाजातील वंचितांसाठी खरोखर आधार ठरली आहे.
डॉ. भारती पाटील आणि रेणु प्रसाद यांच्या पुढाकारातून १९९९ मध्ये संस्थेचे कार्य सुरू झाले. अमळनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये सुमारे ३०० महिला बचत गटांची उभारणी करून बचत आणि आर्थिक व्यवहारांबरोबरच मुलींचे शिक्षण, आरोग्य, स्त्रीभ्रूणहत्या आणि महिलांवरील अत्याचार याबाबत जनजागृती करण्यात आली. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांच्या मदतीसाठी महिला साहाय्यक कक्ष आणि समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात आली. आतापर्यंत २५ हजारांहून अधिक महिला आणि कुटुंबांना या माध्यमातून मदत मिळाली आहे.
संस्थेने २००३ पासून एचआयव्ही प्रतिबंधासाठी देहविक्री व्यवसायातील महिलांबरोबर काम सुरू केले. त्यांच्या मुलांचे शिक्षण, सामाजिक हक्क आणि अधिकृत कागदपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या कामातून महिलांमध्ये नेतृत्व विकसित होऊन ‘स्वाधार’ संघटना उभी राहिली. एचआयव्ही प्रतिबंधाच्या कामातून १० वर्षांत सुमारे २,५०० एचआयव्हीग्रस्त गर्भवतींचा शोध घेण्यात आला. आईकडून बालकाला संसर्ग होऊ नये यासाठी उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रयत्नांतून सुमारे ९८ टक्के बालके एचआयव्हीमुक्त जन्माला आली. सध्या सुमारे १६ हजार एचआयव्हीसह जगणार्या व्यक्तींना काळजी व सहाय्यसेवा दिल्या जात आहेत.
एचआयव्हीसह जगणार्या अनाथ व एकल पालकांच्या सुमारे २०० बालकांना देणग्यांच्या माध्यमातून दरमहा एक हजार रुपयांचे सकस आहाराचे संच दिले जातात. त्यासाठी काही सेवाभावी नागरिकांकडून मदत मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून बालविवाह, बालतस्करी आणि बालकामगारांच्या प्रश्नांवर संस्थेने काम सुरू केले आहे.
बालविवाह होण्यापूर्वीच तो रोखण्यासाठी गावपातळीवर जनजागृती, कुटुंबांशी संवाद आणि आवश्यक ठिकाणी हस्तक्षेप केला जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागातील गर्भवती, माता आणि बालकांच्या आरोग्य व पोषणाच्या प्रश्नांवरही संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. अशा विविध उपक्रमांतून संस्थेने दुर्लक्षित घटकांसाठी हक्क, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची वाट निर्माण केली. या कार्यासाठी संस्थेला दानशुरांकडून आर्थिक मदतीची गरज आहे.
