सोलापूर : माणुसकीपेक्षा पैशाला महत्त्व असलेल्या सध्याच्या समाजात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील निराधार व्यक्ती, बेघर मुले आणि अनाथ बालकांसह घराबाहेर पडलेल्या वृद्धांना आधार देण्याचे कार्य सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील ‘प्रार्थना फाउंडेशन संस्थे’ने चालविले आहे. या सेवाकार्याचा विस्तार करण्यासाठी समाजातील सहृदयी मंडळींकडून हातभार मिळणे अपेक्षित आहे.

बार्शी तालुक्याच्या इर्लेवाडी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रसाद विठ्ठल मोहिते आणि अनु मोहिते या तरुण दाम्पत्याने सामाजिक सेवेच्या बांधिलकीतून, एका ध्येयवादातून प्रार्थना फाउंडेशनची उभारणी २०१६ साली केली. स्वत:च्या दाहक अनुभवाने संवेदनशील बनलेल्या या समविचारी दाम्पत्याने अनाथ, फुटपाथवर भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी सुरुवातीला ‘वंचितांची शाळा एक पाऊल प्रगतीकडे’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सेवाकार्याचा श्री गणेशा केला. भिक्षामुक्ती अभियानाच्या माध्यमातून ‘मुलांना भीक देऊन दुर्बल बनवण्यापेक्षा, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा!’ असा संदेश देत समाजात जनजागृती केली. त्याचवेळी तरुणांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी ‘कृतिशील तरुणाई निवासी शिबिरे’ घेतली.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा

सेवाकार्याचा पुढील टप्पा म्हणून रस्त्यावरची बेघर आणि अनाथ मुले-मुली तसेच आयुष्याच्या संध्याकाळी काठीचा आधार तुटलेल्या वृद्ध आजी-आजोबांसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प उभारला. याकामी प्रसाद मोहिते यांच्या विधवा आईने आपली पाच एकर जमीन, सोने देऊन अनमोल मदत केली. ‘प्रार्थना बालग्राम निवासी प्रकल्पा’चे भूमिपूजन करायला पद्माश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे पुढे आले.

निवासी प्रकल्पाचे बांधकाम सुरू करताना समाजातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले. अनु आणि प्रसाद यांची धडपड, चिकाटी, समाजसेवेचा ध्यास विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरला. जागतिक करोना महामारीच्या संकट काळातही अनाथ मुले आणि निराधार वृद्धांना आधार देण्याचे आव्हान मोहिते दाम्पत्याने समाजातील अनेक हातांच्या मदतीने पेलून दाखविले.

सध्या शेतकरी आत्महत्याग्रस्त अनाथ, वंचित, निराधार, रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या, एक पालक असलेल्या, भविष्य हरविलेल्या मुला-मुलींसाठी ‘प्रार्थना बालग्राम’ कार्यरत आहे. प्रकल्पात ४५ मुले-मुली असून त्यांचे शिक्षण आणि संगोपन संस्थेत होत आहे. याशिवाय अनाथ, बेघर, बेवारस, रस्त्याच्या कडेला खितपत पडलेल्या वृद्ध आजी-आजोबांना आधार मिळावा म्हणून मोफत स्वरूपात वृद्धाश्रम चालविले जाते. तेथे सध्या २३ वृद्धांची आयुष्याची संध्याकाळ ह्यसुखांतह्ण होण्यासाठी आधार दिला जातो. शेतीवाडी, व्यापार, नोकरी करून मोठे केलेल्या मुलांनी आयुष्याच्या संध्याकाळी घरात अडगळीत टाकलेले आणि वाताहत झालेले हे वृद्ध प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात उर्वरित आयुष्य कंठत आहेत. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेताना पारंपरिक सण, उत्सवांसह करमणुकीचे कार्यक्रम राबविले जातात.

‘प्रार्थना फाउंडेशन’च्या अनाथाश्रमात राहणारी मुले सध्या काही अंतरावरील दुसऱ्या शाळेत जातात. त्यासाठी स्वतंत्र शाळा उभी करावयाची आहे. त्या दृष्टीने इमारत बांधकामासह स्वतंत्र स्वयंपाकगृह, भोजन कक्ष आदी सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. त्यासाठी सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता समाजाकडून सढळ मदतीचा हातभार हवा आहे.