मुंबई : सॅटेलाईट आणि एआयचा वापर करून वन्यजीवांवर होणारे हल्ले रोखण्याकरिता उपाययोजना करण्याचे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. मेळघाटमधील ११ वन्य जीवांवरील विषबाधेप्रकरणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना नाईक यांनी ही माहिती दिली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या चौराकुंड वन क्षेत्रात चार रानगवे, चार भेडकी, दोन माकडांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. या भागात मानवी वावर नसताना वाघांच्या शिकारीकरिता पाणवठ्यात विष मिळण्यात आले आणि त्यात या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याचा संबंध मृत प्राण्याच्या तस्करीशी जोडला जात आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून चार फरार असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच यापुढे वन्य प्राण्यांवरील हल्ले रोखण्याकरिता सतर्क राहून काम करू. त्याकरिता सॅटेलाईट आणि एआयची मदत घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्लोबल वॉर्मिंग ते ग्लोबल कुलिंग
आपल्या कार्य़काळात ग्लोबल वॉर्मिंग ते ग्लोबल कुलिंगसाठी जे जे करता येईल ते केले, असे सांगत नाईक यांनी आपल्या कामांची जंत्री सादर केली. त्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी आता अस्तित्त्वात असलेल्या वन क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी काय करणार, असा प्रश्न केला. तसेच, वन्य प्राण्यांवर देखरेख ठेवण्याकरिता त्यांच्या पाणवठ्यांच्या ठिकाणी एआयचा वापर करून लक्ष ठेवणार का असा प्रश्न जगताप यांनी केला.
आमचे ६० पैकी ४२ महिने शिल्लक
आपल्या काळात वन्य विभागाच्या कारभारात सुधारणा केल्याचा दावा गणेश नाईक यांनी केला. वन्य प्राण्यांबरोबरच बाधित आदिवासी, शेतकरी यांच्याविषयीचा वन कर्मचाऱ्यांचा दृष्टीकोन बदलण्याकरिता प्रयत्न केले. आता प्रत्येक जिल्ह्यात अभयारण्य उभारण्याचा विचार आहे. आमच्या सरकारचे ६० पैकी ४२ महिने शिल्लक राहिले आहेत. त्या काळात हे काम करून दाखवू, असे आश्वासन नाईक यांनी दिले.
