सातारा : श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला (ता. माण) शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आल्यावर आपल्याच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याने शिखर शिंगणापूरसह परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावच्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा – माझी लाडकी बहीण योजना कोणी माईचा लाल आला तरीही बंद पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिंगणापूर मार्डी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने मुलीस घेऊन गेला. सोबत आणलेल्या पत्नीस व दोन मुलांस त्याने आईस्क्रीम खायला देऊन शिखर शिंगणापूरमध्येच थांबवले. पेट्रोल टाकण्यासाठी मुलीसह गेलेले वडील पेट्रोल पंपावर गेलेच नाहीत. शिंगणापूर मार्डी रस्त्यावर असलेल्या मक्याच्या शेतात आपल्या दहा वर्षांच्या मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलगी ओरडल्याने आसपासच्या लोकांनी त्याला मुलीपासून वेगळे केले. त्याच्या विरोधात मुलीच्या आईने दहिवडी (ता. खटाव) पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांनी तत्काळ आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.