सातारा : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. राहुल खाडे यांच्याकडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा भार होता. गेल्या दोन वर्षांपासून ते सातारा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात कार्यरत होते. आरोग्य उपसंचालकांकडे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज कर्पे यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयातील महिला सुरक्षा समितीने या अनुषंगाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्या अहवालानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनुसार डॉ. खाडे यांना खासगी नोकरी अथवा कोणताही व्यवसाय व्यापार करता येणार नाही. या कारवाईविषयी डॉ. युवराज कर्पे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
