वाई: जाती निर्मूलनाच्या दिशेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आश्वासक पाऊल टाकले आहे. आंतरजातीय व धर्मीय विवाह वधू वर सूचक केंद्र अंनिस सुरू करणार आहे. ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती हमीद दाभोलकर यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक दि. ८ व आणि ९ जून रोजी सोलापूर येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी राज्यभरातून १७५ अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये १९ जिल्ह्यांतून जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा – “अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली”, संघाच्या मुखपत्रातून टीका
दोन दिवसांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अपील करणे. निकालाचा मराठी अनुवाद करून तो लोकांपर्यंत पोहोचवणे. ‘नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ हे अभियान २० जून ते २० ऑगस्ट २०२४ या दरम्यान सुरू करणे. यामध्ये डॉ. दाभोलकरांच्या १५ पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या साठ हजार प्रती वितरीत करणे. आंतरजातीय जातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक केंद्र सुरू करणे. धार्मिक स्थळावर दैवी उपचार घेणाऱ्या मानसिक रोग्यांसाठी ‘दवा आणि दुवा प्रकल्प’ सुरू करणे. सन २०२४ हे वर्ष ‘प.रा.आर्डे प्रबोधन प्रशिक्षण वर्ष’ जाहीर करून पुढील सहा महिन्यांत प्रामुख्याने सोलापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, खेड या ठिकाणी दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजन करणे. तसेच मुंबई, बीड, अहमदनगर, पालघर, धाराशीव, रत्नागिरी या जिल्ह्यात शिक्षक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आदी निर्णय घेण्यात आले.
बैठकीला राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, प्रा. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रशांत पोतदार,फारुख गवंडी, प्रकाश घादगिने, निळकंठ जिरगे उपस्थित होते.
डॉ. हमीद दाभोलकर आणि राहुल थोरात यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्यात झालेल्या कामाचा अहवाल सादर केला. डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालाचा अन्वयार्थ यावर मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, फारुख गवंडी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निकाल पत्रामध्ये न्यायमूर्तींनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असेही ठरविण्यात आले.
आंतरजातीय जातीय, आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी एक पाऊल पुढे येत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर सूचक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आंतरजातीय व धर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्यांना वाव मिळेल. राज्यात व देशात जाती निर्मूलनाच्या दिशेने एक आश्वासक पाऊल टाकता येईल असा निर्णय ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याची माहिती हमीद दाभोळकर यांनी दिली.
शनिवारी ८ जून रोजी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या हस्ते ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांका’चे प्रकाशन करून बैठकीचे उद्घाटन झाले.