सातारा : अवघ्या १२ दिवसांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने साताऱ्यात मंगळवारी खळबळ उडाली. मुलीच्या कुटुंबीयांनी घातपातातून तिचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. रात्री उशिरा या प्रकरणी पतीविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
भाग्यश्री संजय मोटे (वय २१, मूळ रा. पांढरेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली सध्या रा. विकासनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, भाग्यश्री ३० मार्च रोजी बेपत्ता झाली होती. या घटनेनंतर त्याच दिवशी राजकुमार लालासो कांबळे (२५, मूळ रा. पुळकोटी, ता. माण, जि. सातारा सध्या रा. विकासनगर, सातारा)-याच्यासोबत भाग्यश्रीचा विवाह झाल्याचे मोटे कुटुंबीयांना समजले. यानंतर राजकुमार कांबळे व मोटे कुटुंबीयांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये कांबळे कुटुंबीयांनी हुंडा मागितल्याचा आरोप मोटे कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान १२ एप्रिल रोजी राजकुमार याने मोटे कुटुंबीयांशी संपर्क करत ‘तुमची मुलगी भाग्यश्री हिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तुम्ही लवकर या,’ असे सांगितले. मोटे कुटुंबीय साताऱ्यात आल्यानंतर मुलगी भाग्यश्रीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने ते हादरून गेले. हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. रात्री उशिरा या प्रकरणी पतीविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
आरफळमध्ये एकाचा पत्नीसमोरच खून
आरफळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत एकाने पत्नीच्या समोर पतीच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना घडली. यामध्ये अमर मुगुटराव नलगे (वय ४०, रा. आरफळ ता सातारा) यांचा मृत्यू झाला. ऋषिकेश मारुती कासकर (२५) हा संशयित आरोपी पसार झाला होता. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे आणि पथकाने कासकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
आरफळ-वनगळ रस्त्यालगत ‘गावंदर’शिवारात अमर नलगे व त्यांची पत्नी रेश्मा नलगे शेतात काम करत होते. या वेळी तिथे आलेल्या कासकरसोबत वाद सुरू झाला. यातून कासकरने पत्नीसमोरच अमर नलगे यांच्या डोक्यावर खोऱ्याने जोरदार प्रहार केला. यामध्ये अमर नलगे हे गंभीर जखमी झाले. यानंतर पत्नी व ग्रामस्थांनी नलगे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
नलगे हे पूर्वी वाई अर्बन बँकेत कार्यरत होते. सध्या ते सातारा एमआयडीसीमध्ये काम करत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता. यानंतर आता अवघ्या सहा महिन्यांत घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने नलगे कुटुंबीयांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
