सातारा जिल्हा बँक निकाल: पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी?; शशिकांत शिंदे म्हणाले…

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाटय़ावर आणणारा आहे. 

Sharad Pawar Shashikant Shinde
अवघ्या एका मताने पराभूत झाले शशिकांत शिंदे

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालात दिग्गजांनाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई या दोन दिग्गजांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जातो. यातही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाटय़ावर आणणारा आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन त्यांची भेट घेतली. शिंदे यांच्या पराभवासंदर्भात पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये साताऱ्यामधील सर्किट हाऊसमध्ये चर्चा झाली. या चर्चेला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राष्ट्रवादी सोडण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

शशिकांत शिंदे सर्किट हाऊसमध्ये बाहेर येत असताना पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि ‘पवार यांशी काय बोलणं झालं?’, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शशिकांत शिंदेंनी, ‘मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे कोणतीही चर्चा झालेली नाही. मला जे बोलायचं आहे ते मी २५ तारखेला पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे,’ असं म्हटलं. नंतर पवार यांनी तुमची समजूत काढली का?,’ असा प्रश्न विचारला असता, ‘पवार साहेब नेहमीच माझी समजूत काढतात. पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. त्यांनी विचारलं फक्त की कशापद्धतीने निवडणूक झाली कसं काय झालं,’ असं म्हणत शिंदे यांनी उत्तर दिलं.

‘मी पत्रकार परिषदेमध्ये माझं म्हणणं मांडणार आहे. मी जेव्हा बोलेल तेव्हा माझ्या पुढील राजकीय वाटचालीची कारकिर्द सुद्धा स्पष्ट करणार आहे,’ असं शशिकांत शिंदेंनी म्हणताच त्यावर पत्रकारांनी ‘राष्ट्रवादीत राहूनच की…’ असा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना, ‘मी राष्ट्रवादीचा सच्चा पाईक आहे आणि पवार साहेबांचा सच्चा पाईक आहे. मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही मी आधी सांगितलेलं आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढण्याची जबाबदारी आता माझी असेल,’ असं स्पष्ट शब्दात शिंदेंनी सांगितलं.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एका मताने पराभव झाल्यानंतर शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहिला मिळाले असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सातारा नागरपलिकेत आता मी लक्ष घालणार असल्याचे त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जाहीर केले आहे. त्यामुळे आता साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले असा सामना पहिला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satara district bank election result shashikant shinde after losing election by one vote i will stay with sharad pawar and ncp till last breath scsg

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे