सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालामध्ये काही दिग्गजांनाच धक्का बसल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई या दोन दिग्गजांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जातोय. यातही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाट्यावर आणणारा आहे. दरम्यान हा पराभव जिव्हारी लागल्याने शिंदे समर्थकांनी आज स्वपक्षाच्या कार्यालयावरच जोरदार हल्ला चढवत नासधूस केल्याचंही पहायला मिळालं. आता या सर्व प्रकरणावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“राज्यातील सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. सहकार क्षेत्रावर आतापर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचाच पगडा राहिला हे खरे. ग्रामीण भागाचे अर्थकारण जिल्हा बँका, सहकारी कारखाने, सूत गिरण्या, दूध उत्पादक संघावर अवलंबून आहे. खासकरून जिल्हा सहकारी बँका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ‘अड-नड’ भागवत असतात. त्यामुळे या बँकांची सूत्रे आपल्याच हाती राहावीत व जनतेला उपकृत करण्याचे अधिकार आपल्याकडे राहावेत यासाठी आपापसातच मोठी चढाओढ असते. याच चढाओढीचे प्रात्यक्षिक सहा जिल्हा बँक निवडणुकीत दिसून आले. जय-पराजयानंतर एकमेकांच्या नावाने शिमगाही झाला व एकमेकांच्या घरांवर दगड मारण्यापर्यंत मजल गेली. असे प्रकार लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीतही होत नाहीत,” असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखामधून शिवसेनेनं घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

“सातारा, जळगाव, सांगली, धुळे, नंदुरबार, लातूर, रत्नागिरी या जिल्हय़ांतील सहकारी बँकांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई, मंत्री के. सी. पाडवी यांना हादरे बसले आहेत. सहकार क्षेत्रात सत्तेमुळे भाजपला जी सूज आली होती ती पुरती उतरली आहे हे कालच्या निकालांनी दाखवून दिले, पण सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे हेवीवेट शशिकांत शिंदे फक्त एका मताने पराभूत झाले. त्यांच्याच पक्षाचे एक साधे कार्यकर्ते रांजणे यांनी शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली. शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीचेच लोक सक्रिय होते. शिंदे यांचा पराभव का झाला? कोणी केला? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण यानिमित्ताने जी छोटेखानी दंगल झाली ते चित्र बरे नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“सातारा बँकेत रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शेखर गोरे वगैरे प्रमुख लोक निवडून आले, पण शशिकांत शिंदे यांना ठरवून पाडले गेले. शिंदे यांचा विजय झाला असता तर जिल्हय़ातील सहकाराची सूत्रे त्यांच्या हाती गेली असती. शिंदे हे शरद पवार यांचे कडवट अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत करून कोणी बाजी मारली? जिल्हा बँकेच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नाहीत, पण त्यात पक्षीय आक्रमकता व मोर्चेबांधणी असते. पैशांचा पाऊस तर हमखास पडतो. सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांनी मागे त्या अर्थकारणावर झोत टाकला होता. आमदारकीच्या निवडणुकीस मागे टाकणाऱ्या या निवडणुकांचा खर्च अनाकलनीय आहे. म्हणूनच जिल्हा बँकेचे संचालक, अध्यक्ष व पुढे राज्य सहकारी बँकांचे सूत्रधार बनण्यासाठी अनेकांचे लॉबिंग सुरू होते. सहा जिल्हा बँकांनी तेच दाखवून दिले,” असं लेखात म्हटलं आहे.

“राज्यात फडणवीसांचे राज्य होते तेव्हा या क्षेत्रातील अनेकजण भाजपाच्या गोटात गेले व काही बँकांवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले. सांगलीत पृथ्वीराज देशमुखांसारखे सहकारातील महत्त्वाचे लोक भाजपामध्ये गेले व त्यांनी वर्चस्व ठेवले, पण आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपाला चार जागा जिंकता आल्या व महाविकास आघाडीने १७ जागा जिंकल्या. येथे काँग्रेसचे प्रमुख नेते पराभूत झाले आहेत. धुळे-नंदुरबार सहकारी बँकेतील निवडणुकीत आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांचा पराभव झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी बिनविरोध निवडून आले. संदीप मोहन वळवी हे शिवसेनेचे दुसरे उमेदवार विजयी झाले. सहकार क्षेत्रात शिवसेनेचे हे पदार्पण चांगले आहे. रत्नागिरी सहकारी बँकेत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे. जिल्हा बँकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. जळगावात एकनाथ खडसे यांच्या गटाने भाजपाच्या गिरीश महाजन यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अवस्था राज्यात काय आहे ते चित्र दिसले आहे,” असा टोला लेखामधून लगावण्यात आलाय.

“सहकार क्षेत्रातील निवडणुका गांभीर्याने लढवायच्या असतात, तरच लोकांपर्यंत पोहोचता येते. सहकार क्षेत्र हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. भाजपाचे राज्य गेल्यापासून हा कणा मोडून टाकण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न सुरूच आहेत. सहकार क्षेत्र, कारखानदारी, बँका संकटात आहेत हे खरे; पण त्यास केंद्रीय धोरणे, सूडाचे राजकारण तितकेच जबाबदार आहे. सहकार क्षेत्राला वाहून घेणारी एक स्वतंत्र जमात आहे व त्यांचा आदर व्हायलाच हवा. केंद्रात आता एक वेगळे सहकार मंत्रालय सुरू करून त्याची सूत्रे देशाच्या गृहमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली. त्यातून काही चांगले घडणार असेल तर स्वागत करूया, पण सहा जिल्हय़ांतील सहकारी बँकांचे निकाल बरेच काही सांगून जातात. राज्यातील ग्रामीण भागाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते पाहिले तरी भाजपा पुढाऱ्यांचे पाय जमिनीवर येतील,” असा इशारा शिवसेनेनं दिलाय.